Amazon

नाशिक: सप्तशृंग गडावर ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान नवरात्रोत्सव; १० ते २६ ऑक्टोबरपर्यंत घाट रस्ता खासगी वाहनांसाठी बंद

नाशिक। दि. ४ ऑक्टोबर २०२६: श्री क्षेत्र सप्तशृंग गड येथे श्री सप्तशृंग निवासिनी देवीच्या आश्विन नवरात्र यात्रा आणि कोजागिरी पौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. यंदाचा नवरात्रोत्सव रविवार, दि. ११ ऑक्टोबर ते मंगळवार, दि. २० ऑक्टोबरदरम्यान विविध धार्मिक विधी आणि कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता प्रशासनाकडून वाहतूक व्यवस्थेतही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

नवरात्रोत्सवादरम्यान देवीची पंचामृत महापूजा, घटस्थापना, ललिता पंचमी, दुर्गाष्टमी, होम-हवन यांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता कीर्ती ध्वज मिरवणूक काढण्यात येणार असून, रथोत्सव आणि ध्वजपूजाही याच दिवशी होणार आहे. मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी महानवमी आणि विजयादशमीचा उत्सव साजरा होईल.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ऑक्टोबर हीटचा तडाखा सुरूच; नाशिकचे कमाल तापमान ३५ अंशांवर !

यानंतर २५ आणि २६ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. या काळात कावडीद्वारे आणलेल्या पाण्याने देवीचा जलाभिषेक तसेच महापूजेसह विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत.

उत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टकडून आवश्यक त्या सर्व तयारीला वेग देण्यात आला आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, तसेच मंदिराच्या जीर्णोद्धारासह विविध विकासकामांसाठी सढळ हाताने देणगी देऊन सहकार्य करावे, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये ‘ऑक्टोबर हीट’चा चटका वाढला; कमाल तापमान ३४.८ अंशांवर

नांदुरी-सप्तशृंग गड घाट रस्ता खासगी वाहनांसाठी बंद:
नवरात्र आणि कोजागिरी उत्सवाच्या कालावधीत सप्तशृंग गडावर होणारी गर्दी लक्षात घेऊन शनिवार, दि. १० ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून सोमवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत नांदुरी ते सप्तशृंग गड हा घाट रस्ता खासगी वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी घुसखोरांना अटक !

भाविकांची वाहतूक सुरळीत राहावी आणि गर्दीमुळे गैरसोय होऊ नये, यासाठी या कालावधीत सुमारे १५० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या बसेसच्या माध्यमातून भाविकांना नांदुरी ते सप्तशृंग गड तसेच परतीचा प्रवास करता येणार आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे:
घटस्थापना व नवरात्रारंभ : रविवार, ११ ऑक्टोबर.
दुर्गाष्टमी, रथोत्सव व ध्वजपूजा : सोमवार, १९ ऑक्टोबर.
महानवमी व विजयादशमी (दसरा) : मंगळवार, २० ऑक्टोबर.
कोजागिरी पौर्णिमा उत्सव : २५ व २६ ऑक्टोबर

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790