नाशिक। दि. २२ नोव्हेंबर २०२६: सेवानिवृत्त सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) हेमंत गोविंद हेमाडे (वय ५९) यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांच्या कुटुंबातील चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालमत्तेच्या वादातून मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळ केल्याचा आरोप त्यांच्या दुसऱ्या पत्नी योगिता हेमाडे (वय ५२) यांनी तक्रारीत केला आहे.
हेमंत हेमाडे यांनी शुक्रवारी (दि. २०) स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवले होते. याप्रकरणी पत्नी योगिता यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिसांनी मुलगा यश हेमाडे, सून भाग्यश्री हेमाडे, मुलगी प्रियंका कुणाल खोपकर आणि यशचे सासरे मल्लिकार्जुन उमदी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
योगिता यांच्या तक्रारीनुसार, हेमंत यांनी त्यांच्याशी दुसरा विवाह केल्यानंतर कुटुंबात वाद सुरू झाले होते. मालमत्तेवरील हक्क सोडण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात होता. तसेच, फसवणुकीने बळकावलेली मिळकत परत मिळवण्यासाठी दाखल केलेला दावा आणि न्यायालयात सुरू असलेली अन्य प्रकरणे मागे घेण्यासाठी पतीला वारंवार धमकावले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
न्यायालयीन खटले मागे घेण्यासाठी दबाव टाकण्याबरोबरच जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या सततच्या त्रासामुळे हेमाडे यांना मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळाला सामोरे जावे लागले. परिणामी, त्यांची सर्व बाजूंनी कोंडी होऊन त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप योगिता यांनी केला आहे.
न्यायालयातील सुनावणीसाठी पुन्हा हजर राहिल्यास ती शेवटची तारीख ठरेल, अशा शब्दांत पतीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा गंभीर आरोपही योगिता यांनी केला आहे. या धमक्यांमुळे आणि सातत्याने होणाऱ्या त्रासामुळे हेमाडे मानसिक दबावाखाली होते, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक अहिरराव तपास करीत आहेत. पोलिस तपासानंतर या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
![]()


