Amazon

नाशिकमध्ये १८ प्रमुख रस्त्यांची कामे सुरू; नोव्हेंबरपासून डांबरीकरणाचा वेग वाढणार

नाशिक। दि. ४ ऑक्टोबर २०२६: पावसाने उघडीप दिल्याने नाशिक शहरातील रस्त्यांची कामे आता वेगाने पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज दिले.

नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात नाशिक महानगरपालिकेशी निगडित विविध कामांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर हिमगौरी आडके आहेर, आमदार प्रा. देवयानी फरांदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, मनपा आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, उपायुक्त प्रदीप चौधरी, विवेक भदाणे, नियोजन उपायुक्त योगेंद्र चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. महाजन यांनी शहरातील रस्ते, पूल, पाणीपुरवठा आणि मलनिस्सारणाशी संबंधित विविध विकासकामांचा आढावा घेतला. नागरिकांच्या दैनंदिन गरजा आणि शहराच्या वाढत्या विकासाच्या दृष्टीने ही कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

🔎 हे वाचलं का?:  मॉन्सूनची माघार वेगाने; महाराष्ट्राच्या निम्म्या भागातून पाऊस परतला

घारपुरे घाट ते रामवाडी पुलाचे काम प्रलंबित राहू नये, यासाठी आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून हे काम लवकरात लवकर सुरू करावे. पुलाच्या कामामुळे संबंधित परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ होण्यास मदत होणार असल्याने कामाच्या प्रगतीवर नियमित लक्ष ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

तसेच तपोवन आणि आगरटाकळी येथील मलनिस्सारण प्रकल्पांच्या कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले. या प्रकल्पांमुळे परिसरातील मलनिस्सारण व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून, नागरिकांना आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे.

शहरातील रस्ते, पूल, पाणीपुरवठा आणि मलनिस्सारणाची प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करून नागरिकांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा, असे निर्देश पालकमंत्री श्री. महाजन यांनी दिले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चोरी गेलेला ३.७५ कोटींचा मुद्देमाल पोलिसांकडून फिर्यादींना परत

पावसामुळे रस्त्यांवर निर्माण झालेले खड्डे प्राधान्याने बुजवून कामाची गुणवत्ता कायम ठेवावी. खड्डे बुजविण्याच्या कामात कोणताही विलंब होऊ नये, तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांचीही पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी तातडीने दुरुस्ती करावी.

शहरात सध्या सुमारे १८ प्रमुख रस्त्यांची कामे सुरू आहेत. या रस्त्यांवरील विविध युटिलिटीची सुमारे ९० टक्के कामे पूर्ण झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. त्यामुळे आता रस्त्यांच्या प्रत्यक्ष कामाला गती देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नोव्हेंबरपासून डांबरीकरणासह रस्त्यांची इतर कामे सुरू करण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांनाही प्राधान्य देण्यात येत आहे. द्वारका ते सिन्नर फाटा या मार्गासह शहरातील विविध प्रमुख रस्त्यांच्या कामांचा बैठकीत आढावा घेण्यात आला. पावसामुळे कामांमध्ये आलेला विलंब भरून काढण्यासाठी उपलब्ध कालावधीचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ऑक्टोबर हीटचा तडाखा सुरूच; नाशिकचे कमाल तापमान ३५ अंशांवर !

दरम्यान, गंगापूर रोडला समांतर रस्ता उभारण्याच्या प्रस्तावालाही गती देण्यात येणार आहे. या कामासाठी एक महिन्यात निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी दिली.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा वेग वाढत असताना शहरातील रस्ते, वाहतूक आणि पायाभूत सुविधांची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून प्रलंबित कामांना गती देण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

आमदार श्रीमती फरांदे यांनी शहरातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी सूचना केली. महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री यांनी महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या विकास कामांची माहिती दिली. यावेळी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात मनपामार्फत सुरू असलेल्या विविध विकास कामांचाही आढावा घेण्यात आला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790