त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये आजपासून विविध धार्मिक कार्यक्रम

नाशिक। दि. २२ नोव्हेंबर २०२६ : वैकुंठ चतुर्दशी आणि त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाचे मुख्य आकर्षण असलेला पारंपरिक रथोत्सव मंगळवारी (दि. २४) साजरा होणार आहे. देवस्थानचे सहआयुक्त विवेक सोनुने आणि विश्वस्तांच्या बैठकीत उत्सवाच्या नियोजनाला अंतिम मान्यता देण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक-त्र्यंबकेश्वर वाहतुकीत २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान महत्वाचे बदल

रविवारी (दि. २२) मध्यरात्री १२ ते पहाटे २.३० या वेळेत महापूजा, पालखी सोहळा आणि ‘हरिहर भेट’ हा धार्मिक सोहळा पार पडणार आहे. या परंपरेनुसार देवस्थानचे विश्वस्त नाशिक येथील श्री काळाराम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामांसाठी बेलपत्र अर्पण करतील. त्यानंतर तेथून श्री त्र्यंबकराजांसाठी तुळशीपत्र आणण्यात येणार आहे.

सोमवारी (दि. २३) दुपारी सरदार विंचूरकर यांच्या वतीने महापूजा करण्यात येईल. तर मंगळवारी (दि. २४) सकाळी गंधाक्षता विधीनंतर दुपारी ३.३० वाजता रथोत्सवाला प्रारंभ होईल. यावेळी रथासह पालखी मिरवणूक कुशावर्त तीर्थापर्यंत काढण्यात येणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता मिरवणूक मंदिरात परतल्यानंतर रात्री ८ वाजता मंदिर परिसरातील दीपमाळ प्रज्वलित करण्यात येईल.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: दुचाकी वाहनांसाठी ‘एमएच १५-एलजी’नवीन मालिका २३ नोव्हेंबरपासून सुरू

दर्शन व्यवस्थेत बदल

उत्सवासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंगळवारी (दि. २४) दुपारी १२ वाजेनंतर देणगी दर्शन, तर रात्री ८ वाजेनंतर धर्मदर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. स्थानिक ग्रामस्थांनी ओळखपत्र दाखवून पश्चिम द्वारातून प्रवेश करावा, असे आवाहन देवस्थान ट्रस्टने केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये आता रोबोटिक सर्जरीची सुविधा; अपोलो हॉस्पिटल्समध्ये अत्याधुनिक युनिट सुरू

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त महिलांनी त्रिपुरवाती प्रज्वलित करून धार्मिक परंपरेत सहभागी व्हावे, असे आवाहनही ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790