नाशिक: शहरातील ‘या’ लोकप्रिय मिसळ पॉइंट्स व हॉटेलवर FDA ची धडक कारवाई !

नाशिक। दि. २१ नोव्हेंबर २०२६: अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन आढळून आल्याने अन्न व औषध प्रशासन, नाशिक यांनी शुक्रवारी (२० नोव्हेंबर) एकाच दिवसात शहरातील चार अन्न आस्थापनांचे परवाने आणि एका आस्थापनाचे नोंदणी प्रमाणपत्र तात्काळ निलंबित केले. या कारवाईमुळे शहरातील खाद्य व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

तपासणी मोहीम:
अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे, सह आयुक्त मंगेश माने तसेच सहायक आयुक्त (अन्न) श्री. विनोद धवड आणि ज्ञानेश्वर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहरातील अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणीत अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन आढळल्याने दुसऱ्या दिवशी ही कारवाई करण्यात आली.

परवाने निलंबित झालेली आस्थापने:
१. हॉटेल विहार, वुडलँड टॉवर (जुना गंगापूर नाका, गंगापूर रोड)
२. हॉटेल श्यामसुंदर (सी रोड, एमआयडीसी, सातपूर)
३. हॉटेल तुषार मिसळ (असावरी चेंबर्स समोर, मलेरिया स्टॉप, कॉलेज रोड)
४. हॉटेल महाराजा काठियावाडी (आडगाव फाटा, आडगाव शिवार, मुंबई-आग्रा रोड, पंचवटी)

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमासाठी मतदारांनी ३० नोव्हेंबरपर्यंत गणना प्रपत्र भरून देण्याचे आवाहन

नोंदणी प्रमाणपत्र निलंबित झालेले आस्थापन:
१. कॅफे दुर्गा कॅफे (क्यूबॉइड बिझनेस सेंटर, कृषीनगर, कॉलेज रोड)

कारवाईमागील कारणे:
तपासणीत प्रत्येक आस्थापनात आढळलेल्या त्रुटी पुढीलप्रमाणे:

  • हॉटेल विहार, वुडलँड टॉवर: अन्न सुरक्षा व मानके नियम, २०११ मधील अनुसूची-४ (Schedule-4) मधील तरतुदींचे उल्लंघन; आस्थापनात अस्वच्छ परिस्थिती; अन्न तयार करण्याच्या ठिकाणी कीटक व इतर उपद्रवी जीवांचा प्रादुर्भाव.
  • हॉटेल श्यामसुंदर: अनुसूची-४ मधील तरतुदींचे उल्लंघन; अस्वच्छ परिस्थिती; कच्चा अन्नमाल अस्वच्छ परिस्थितीत साठविलेला; स्वयंपाकघराच्या निर्धारित रचना व बांधकामविषयक अटींचे उल्लंघन.
  • दुर्गा कॅफे: अनुसूची-४ मधील तरतुदींचे उल्लंघन; अस्वच्छ परिस्थिती; ग्राहकांना देण्यात येणाऱ्या बिलावर FSSAI परवाना क्रमांक नमूद नसणे; मेन्यू कार्डवर अथवा डिस्प्ले एरियामध्ये स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या माध्यमाचा (Cooking Medium) उल्लेख नसणे.
  • हॉटेल तुषार मिसळ: अनुसूची-४ मधील तरतुदींचे उल्लंघन; अस्वच्छ परिस्थिती; अन्नपदार्थांच्या साठवणुकीसाठी अपुरी जागा; मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळले.
  • हॉटेल महाराजा काठियावाडी: अनुसूची-४ मधील तरतुदींचे उल्लंघन; अस्वच्छ परिस्थिती; मुदतबाह्य अन्नपदार्थ साठविलेले; अन्नपदार्थ तयार करण्याच्या जागेत धूळ व कीटकांचा प्रवेश रोखण्यासाठी व्यवस्था नसणे.
🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पत्नीच्या खुनाची कबुली; फरार पतीला अटक, न्यायालयाकडून पोलीस कोठडी

कारवाई करणारे अधिकारी:
ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती अश्विनी पाटील, श्रीमती ऋतुजा नवले, प्रतिक भड, किशोर चांदगुडे आणि संकेत येलमामे यांनी केली.

सातत्याने कारवाई सुरू राहणार:
अन्नपदार्थांची सुरक्षितता, स्वच्छता व नागरिकांचे आरोग्य यांना सर्वोच्च प्राधान्य देऊन अशा आस्थापनांची तपासणी आणि नियमानुसार कारवाई सातत्याने करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम आणि त्याअंतर्गत नियम व विनियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहराच्या 'या' भागांतील वीजपुरवठा शनिवारी (दि. २१) बंद राहणार !

नागरिकांना आवाहन:
अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत किंवा सुरक्षिततेबाबत कोणताही संशय असल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाच्या complaints.mahafda.in या संकेतस्थळावर आपली तक्रार नोंदवावी. तसेच सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ व त्याअंतर्गत लागू नियम आणि विनियमांतील तरतुदींचे काटेकोर पालन करावे; आवश्यक अन्न सुरक्षा परवाना अथवा नोंदणी प्राप्त केल्यानंतरच अन्न व्यवसाय करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन, नाशिक विभागामार्फत करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790