नाशिक: थंडीचा कडाका वाढला; पुढील आठवडाभर हुडहुडी कायम राहण्याचा अंदाज

नाशिक, दि. २२ नोव्हेंबर २०२६ : उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने नाशिक शहरासह जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला आहे. शनिवारी (दि. २१) सलग दुसऱ्या दिवशी किमान तापमान १० अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. मात्र, आज- रविवारी (दि. २२) किमान तापमानात वाढ होऊन पारा १२.७ अंश सेल्सिअसवर पोहोचला. तरीही वातावरणातील गारठा कायम असून, पुढील आठवडाभर जिल्ह्यात थंडीची तीव्रता अधिक जाणवण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: दुचाकी वाहनांसाठी ‘एमएच १५-एलजी’नवीन मालिका २३ नोव्हेंबरपासून सुरू

गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला असला, तरी आकाश प्रामुख्याने निरभ्र आहे. पहाटेच्या वेळी फारसे धुके जाणवले नाही. मात्र, रविवारी शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत मध्यम स्वरूपाचे धुके पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. सोमवारपासून (दि. २३) पुढील आठवडाभर शहर आणि परिसरात हलक्या स्वरूपाचे धुके पाहायला मिळण्याचा अंदाज आहे.

चक्रीवादळामुळे थंडीसाठी पोषक वातावरण:
यंदा एल-निनोच्या प्रभावामुळे थंडीची तीव्रता तुलनेने कमी राहील, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला होता. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये अपेक्षित असलेली थंडी नोव्हेंबरपासून जाणवू लागली आहे. दरम्यान, ‘अक्वान’ चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीमार्गे ओडिशाच्या दिशेने सरकत असल्याने महाराष्ट्रात थंडीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचे हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' लोकप्रिय मिसळ पॉइंट्स व हॉटेलवर FDA ची धडक कारवाई !

नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात नाशिकमधील किमान तापमान सरासरीपेक्षा सुमारे चार अंशांनी खाली जाणे ही रब्बी हंगामातील पिकांच्या दृष्टीने अनुकूल बाब मानली जात आहे.

गतवर्षी नोव्हेंबर महिन्यातही नाशिककरांना कडाक्याच्या थंडीचा अनुभव आला होता. १० नोव्हेंबर रोजी किमान तापमान १०.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले होते. त्यानंतर काही दिवस तापमान १० अंशांच्या पुढे स्थिर होते. मात्र, १७ नोव्हेंबरला पारा घसरून ९.६ अंशांवर, तर १८ नोव्हेंबरला हंगामातील नीचांकी ९.२ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात मात्र थंडीचा जोर कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790