Amazon

नाशिकमध्ये अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी घुसखोरांना अटक !

नाशिक। दि. ३ ऑक्टोबर २०२६: भारतात अधिकृत परवानगीशिवाय प्रवेश करून नाशिक शहरात वास्तव्यास असल्याच्या संशयावरून दोन बांगलादेशी नागरिकांना गुन्हे शाखेच्या युनिट-१ पथकाने अटक केली. पोलिसांनी केलेल्या कारवाईत त्यांच्या ताब्यातून बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्ड जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही संशयितांना शनिवारी (दि. ३) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: निमाणी, मेळा बसस्थानक परिसरात मोबाइल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश; सहा जण अटकेत

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या निर्देशानुसार शहरात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांचा शोध घेऊन कारवाई करण्याची मोहीम सुरू आहे. यासाठी पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेच्या पथकांना सूचना दिल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट-१ चे पोलिस अंमलदार प्रवीण वाघमारे आणि विशाल देवरे यांना पंचवटीतील जयनाथनगर परिसरात काही बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररीत्या राहत असल्याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा केल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. आंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली पथकाने परिसरात सापळा रचून कारवाई केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रेमविवाह केल्याच्या रागातून विवाहितेचे अपहरण; नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे डांबून मारहाण

या कारवाईत रोनी अब्दुल शेख ऊर्फ महंमद मुशर्रफ हुसैन मुजीबुररहमान खोकन (वय ३२, रा. मीजीबाडी, खेजुतल, बांगलादेश) आणि आशिक अलीअकबर अन्सारी ऊर्फ महंमद सज्जात हुसैन आशिक (वय २४, रा. सोमोहनी, नोयाखाली, बांगलादेश) यांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी दोघांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्ड आढळून आले. पोलिसांच्या माहितीनुसार, कोणतीही अधिकृत परवानगी नसताना भारतात प्रवेश करून नाशिकमध्ये वास्तव्य करत असल्याचे त्यांनी चौकशीत सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये ‘ऑक्टोबर हीट’चा चटका वाढला; कमाल तापमान ३४.८ अंशांवर

या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट-१ चे पोलिस अंमलदार मुख्तार शेख यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक चेतन श्रीवंत आणि दत्तात्रय पोटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790