नाशिक: दुचाकी वाहनांसाठी ‘एमएच १५-एलजी’नवीन मालिका २३ नोव्हेंबरपासून सुरू

नाशिक। दि. २१ नोव्हेंबर २०२६: प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक येथे दुचाकी वाहनांसाठी ‘एमएच 15-एलजी’ ही नवीन नोंदणी क्रमांक मालिका २३ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक मिळविण्यासाठी इच्छुक वाहनधारकांनी विहित कार्यपद्धतीनुसार अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

आकर्षक व पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी विहित नमुन्यातील अर्ज २३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० या वेळेत कार्यालयातील आवक-जावक विभाग कक्ष क्रमांक १ येथे जमा करणे आवश्यक आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत अर्जातील त्रुटींची तातडीने पूर्तता करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन

अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ४ तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ५-अ नुसार आवश्यक असलेल्या पत्त्याच्या पुरावा आधारकार्ड, फोन बिल, पासपोर्ट इत्यादी साक्षांकित छायांकित प्रत, अर्जदाराच्या फोटो ओळखपत्राची (आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड इत्यादी साक्षांकित प्रत तसेच वाहन नोंदणीसाठी दिलेला आधार लिंक मोबाइल क्रमांक सादर करणे आवश्यक आहे.नोंदणी क्रमांकाच्या विहित शुल्काची रक्कम राष्ट्रीयीकृत अथवा शेड्युल्ड बँकेच्या डिमांड ड्राफ्टद्वारे ‘प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक यांच्या नावे काढून अर्जासोबत जोडावी. तसेच पॅनकार्डची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा गळा आवळून खून

एकाच पसंतीच्या क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास संबंधित आकर्षक क्रमांकांची यादी कार्यालयातील नोटीस बोर्डवर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. अशा अर्जदारांसाठी २५ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता लिलाव प्रक्रिया आयोजित करण्यात येणार आहे. लिलावात सहभागी होण्यासाठी विहित शुल्काच्या डिमांड ड्राफ्टव्यतिरिक्त बोलीच्या रकमेचा स्वतंत्र डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात सादर करणे आवश्यक आहे. सर्वाधिक बोलीची रक्कम देणाऱ्या अर्जदारास संबंधित पसंतीचा नोंदणी क्रमांक वितरित करण्यात येईल.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहराच्या 'या' भागांतील वीजपुरवठा शनिवारी (दि. २१) बंद राहणार !

एकदा राखून ठेवलेला पसंतीचा नोंदणी क्रमांक कोणत्याही परिस्थितीत बदलता अथवा रद्द करता येणार नाही. तसेच हा क्रमांक केवळ पती, पत्नी, मुलगा किंवा मुलगी यांच्या नावावर हस्तांतरित करता येईल. राखून ठेवलेल्या क्रमांकासाठी भरलेले शासकीय शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही, याची अर्जदारांनी नोंद घ्यावी. आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी आकारण्यात येणाऱ्या शासकीय विहित शुल्काची सविस्तर माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक येथील नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790