Amazon

नाशिकरोड बसस्थानक तीन महिने बंद; सिटीलिंकच्या बसमार्गांत महत्वाचे बदल

नाशिक। दि. २१ सप्टेंबर २०२६: नाशिकरोड बसस्थानकाच्या काँक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात आल्याने हे बसस्थानक २१ सप्टेंबर ते २० डिसेंबर २०२६ या तीन महिन्यांच्या कालावधीत पूर्णपणे बंद राहणार आहे. या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी सिटीलिंकने बसमार्ग, फेऱ्या आणि थांब्यांच्या व्यवस्थेत महत्त्वाचे बदल केले आहेत.

याबाबत पोलिस उपायुक्त चंद्रकांत गवळी यांनी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार नाशिकरोड परिसरातील बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळा: रामकुंड परिसरातील कामे ३ आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश

त्र्यंबकेश्वरच्या बस थेट रेल्वे स्थानकातून:
त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या मार्ग क्रमांक २४५ आणि १४५ वरील सिटीलिंक बस आता नाशिकरोड बसस्थानकाऐवजी नाशिकरोड रेल्वे स्थानकातून सुटतील आणि तेथेच परततील. या मार्गांवर दिवसभरात एकूण १८८ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.

पंचवटी एक्सप्रेसच्या प्रवाशांसाठी पाच बस:
रात्री ९.४५ वाजता पंचवटी एक्सप्रेसने नाशिकरोड रेल्वे स्थानकावर पोहोचणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील विविध भागांत जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी त्या वेळी पाच सिटीलिंक बस रेल्वे स्थानकावर उपलब्ध राहतील.

रात्री रेल्वे प्रवाशांसाठीही बससेवा:
नाशिकरोडला रात्री उशिरा रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी पाच सिटीलिंक बस रात्रभर रेल्वे स्थानकातून विविध मार्गांवर उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणासोबत वृक्षसंवर्धनालाही प्राधान्य द्यावे- पालकमंत्री गिरीश महाजन

तपोवन-सिन्नर मार्गातही बदल:
तपोवन ते सिन्नर या मार्गावरील बससेवेसाठीही पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
जाण्याचा मार्ग : बिटको चौक → नाशिकरोड पोलीस ठाणे → विभागीय आयुक्त कार्यालय → टी-पॉइंट → उड्डाणपूल अप रॅम्प → सिन्नर फाटा.
परतीचा मार्ग : सिन्नर फाटा → मारुती मंदिर → उड्डाणपूल डाऊन रॅम्प → छत्रपती शिवाजी महाराज चौक → बिटको चौक → दत्त मंदिर चौक.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मुंबईनाका वाहतूककोंडी फोडण्यासाठी एसटी बसच्या मार्गात बदल; दोन्ही प्रवेशद्वारांचा कायमस्वरूपी वापर

शहरातील इतर बसफेऱ्याही पर्यायी मार्गाने:
शहरातील अन्य मार्गांवर धावणाऱ्या सिटीलिंक बसेस नाशिकरोड सिटीलिंक बस आगारातून सुटणार आहेत. या बसेस सिन्नर फाटा, उड्डाणपूल डाऊन रॅम्प, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बिटको चौक आणि दत्त मंदिर चौक मार्गे नाशिक शहराच्या दिशेने धावतील.

नाशिकरोड बसस्थानकाच्या काँक्रीटीकरणाच्या कामामुळे करण्यात आलेल्या या तात्पुरत्या बदलांची प्रवाशांनी नोंद घ्यावी आणि प्रवासाचे नियोजन त्यानुसार करावे, असे आवाहन सिटीलिंक प्रशासनाने केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790