गणेशोत्सवानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयातर्फे लोकसंवाद कार्यक्रम संपन्न

नाशिक। दि. २१ सप्टेंबर २०२६: पर्यावरण संवर्धन आणि हरित नाशिक साकारण्यासाठी केवळ वृक्षारोपण न करता लावलेल्या वृक्षांचे संवर्धन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, स्वच्छता आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना लोकसहभागाची जोड देत ‘हरित नाशिक’चा संकल्प साकारावा, असे आवाहन राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन, कुंभमेळा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक आणि इलेक्ट्रॉनिक ॲण्ड डिजिटल मीडिया असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत शनिवारी गणेश महाआरती व पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री श्री. महाजन बोलत होते. पालकमंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते मंडळाच्या गणेशाची महाआरती व पूजन करण्यात आले.
यावेळी महापौर हिमगौरी आडके-आहेर, आमदार गोकुळ गिते, नगरसेविका श्रीमती पांडे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, माहिती अधिकारी गोपाळ साळुंखे, इलेक्ट्रॉनिक ॲण्ड डिजिटल मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष किरण नाईक, महाराष्ट्र अध्यक्ष सतीश रूपवते, नाशिक जिल्हाध्यक्ष संदीप नवसे यांच्यासह पदाधिकारी आणि गणेशभक्त उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देताना पालकमंत्री श्री. महाजन म्हणाले, गणेशोत्सव हा श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव आहे. या उत्सवाला पर्यावरण संवर्धनाची जोड देत प्रत्येक गणेश मंडळाने वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन आणि स्वच्छतेचे उपक्रम राबवावेत. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, नैसर्गिक सजावटीचे साहित्य आणि पर्यावरणास अनुकूल उपक्रमांचा अवलंब करावा. वृक्षारोपण केल्यानंतर त्याची नियमित देखभाल करून झाड जगविण्याची जबाबदारी स्वीकारणे हीच पर्यावरण संवर्धनाची खरी दिशा आहे, असे त्यांनी सांगितले.
‘उन्नत नाशिक’ अभियानाच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. नागरिक, सामाजिक संस्था, गणेश मंडळे आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे काम केल्यास नाशिकच्या विकासाला अधिक गती मिळेल. गणेशोत्सवातून सामाजिक सलोखा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे पोहोचविता येईल. वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन, स्वच्छता आणि पर्यावरण जनजागृती यांच्या माध्यमातून ‘हरित कुंभ’ उभारावा, असे आवाहनही त्यांनी केले.
‘लोकसंवाद-२०२६’च्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि लोककल्याणकारी निर्णयांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांशी थेट संवाद साधून सामाजिक व पर्यावरणविषयक संदेश देण्यासोबत शासन आणि नागरिकांमधील संवाद अधिक प्रभावी करण्याचा जिल्हा माहिती कार्यालयाचा लोकसंवाद या उपक्रमातून प्रयत्न करण्यात येत आहे. नाशिकच्या गणेशोत्सवाची सांस्कृतिक परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत जतन करण्यासाठी bappa.org हा डिजिटल उपक्रम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री महाजन यांनी केले.
यावेळी जिल्हा माहिती कार्यालय येथील उपसंपादक प्रवीण बावा, छायाचित्रकार मनोज अहिरे, नवनाथ पालवे, संदेश केदारे, वैभव घुगे, अमोल सोनवणे आदींनी संयोजन केले.
![]()


