नाशिक। दि. १ ऑकटोबर २०२६: कुटुंबीयांच्या विरोधाला न जुमानता प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून १९ वर्षीय विवाहितेचे तिच्या आई-वडिलांसह नातेवाइकांनी कथितरीत्या अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. तिला नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे नेऊन डांबून ठेवण्यात आले. तसेच, दुसऱ्या तरुणाशी लग्न लावून देण्याची धमकी देत तिच्यावर मारहाण केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून तिच्या आई-वडिलांसह पाच नातेवाइकांविरुद्ध आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित तरुणीने कुटुंबीयांचा विरोध पत्करून २० एप्रिल २०२६ रोजी नाशिकमध्ये आपल्या पसंतीच्या तरुणासोबत विवाह केला होता. दरम्यान, ११ ऑगस्ट रोजी तिचे आई-वडील आणि काही नातेवाईक आजारी सासू-सासऱ्यांची भेट घेण्याच्या कारणाने नाशिकमध्ये आले.
दुसऱ्या दिवशी, १२ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास सासऱ्यांना रुग्णालयात भेटण्यासाठी जाण्याचे सांगून संशयितांनी तरुणी आणि तिच्या पतीला कारमध्ये बसवले. कार पुणे रोडच्या दिशेने नेण्यात आली. शिंदे पळसे टोलनाक्याजवळ पोहोचण्यापूर्वी तिच्या पतीला कारमधून खाली उतरवण्यात आले. त्यानंतर तरुणीला जबरदस्तीने कारमध्येच ठेवून रामटेक येथे नेण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
रामटेक येथील नातेवाइकाच्या घरी नेल्यानंतर तरुणीला कथितरीत्या डांबून ठेवण्यात आले. तसेच, समाजातील दुसऱ्या तरुणाशी तिचे लग्न लावून देण्याचे सांगण्यात आले. या काळात आई-वडील आणि मामाने तिच्याशी मारहाण केल्याचाही आरोप तिने तक्रारीत केला आहे.
दरम्यान, २८ ऑगस्टच्या पहाटे मामा-मामीची नजर चुकवून तरुणीने घरातून बाहेर पडत सुटका करून घेतली. त्यानंतर एसटी बस आणि रेल्वेने प्रवास करून ती नाशिकला सासरी पोहोचली. पतीसोबत आडगाव पोलिस ठाण्यात जाऊन तिने संपूर्ण प्रकाराची माहिती देत तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तरुणीच्या आई-वडिलांसह संबंधित नातेवाइकांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार बहिरम करीत आहेत.
![]()


