Amazon

नाशिक: निमाणी, मेळा बसस्थानक परिसरात मोबाइल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश; सहा जण अटकेत

नाशिक। दि. १ ऑक्टोबर २०२६: नाशिक शहरातील निमाणी व मेळा बसस्थानक परिसरात हत्यारांच्या धाकावर मोबाइल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक १ ने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी झारखंडमधील सहा संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून तब्बल ३ लाख ३२ हजार ५०० रुपये किमतीचे चोरीचे मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ सप्टेंबर रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ मधील पोलीस हवालदार देविदास ठाकरे व पोलीस अंमलदार आप्पा पानवळ यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. ठक्कर बाजार व मेळा बसस्थानक परिसरात हत्यारांसह मोबाइल चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही बाब वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रेमविवाह केल्याच्या रागातून विवाहितेचे अपहरण; नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे डांबून मारहाण

वरिष्ठांच्या सूचनेनुसार पोलिसांनी माहितीची खातरजमा करून संबंधित परिसरात सापळा रचला. त्यावेळी संशयास्पद हालचाली करणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये अमित हरिलाल महतो (४०), सोहकुमार अरवा महतो (१९), रोशनकुमार नेपाळी महतो (२०), सनीकुमार बाडीस महतो (१८), मोहम्मद इतेसर आलम सलीम शेख (१९) आणि रोहन अरवा महतो (२१) यांचा समावेश आहे. हे सर्वजण झारखंड राज्यातील साहेबगंज परिसरातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ब्लॅक फिल्म लावणाऱ्या ९६२ वाहनांवर कारवाई; ७.७० लाखांचा दंड

पोलिसांनी आरोपींकडून मिळालेल्या मोबाइलची तपासणी केली असता ते चोरीचे असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत आरोपींनी नाशिक शहरातील सरकारवाडा, नाशिक रोड आणि पंचवटी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हत्यारांचा वापर करून चोरी केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणात संबंधित पोलीस ठाण्यांच्या अभिलेखांची तपासणी केली असता मोबाइल चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. या टोळीने आणखी काही ठिकाणी अशाच प्रकारच्या चोऱ्या केल्या आहेत का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790