Amazon

मेडिलिव्ह हॉस्पिटल, नाशिक आणि अपोलो हॉस्पिटल, नवी मुंबई यांच्या संयुक्त यकृत प्रत्यारोपण उपक्रमामुळे उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना मिळाले नवे जीवन !

नाशिक। दि. २५ सप्टेंबर २०२६: नाशिकमधील मेडिलिव्ह हॉस्पिटल आणि नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल यांनी यकृताच्या गंभीर आणि प्रगत आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना योग्य वेळी उपचार आणि यकृत प्रत्यारोपणाची सुविधा मिळावी याकरीता संयुक्तपणे उपक्रम सुरु केला असून या उपक्रमांतर्गत उत्तर महाराष्ट्रातील लिव्हरच्या गंभीर आजाराने त्रस्त रुग्णांना लिव्हर प्रत्यारोपणाने नवीन आयुष्य मिळाले आहे , या उपक्रमामुळे प्रत्यारोपणा आधी आणि प्रत्यारोपणा नंतरच्या उपचारांमध्ये सातत्य राहाते ,तसेच रुग्णांची प्रवासाची गैरसोय होत नाही.

या वेळी बोलताना डॉ. शरद देशमुख म्हणाले, “यकृतविकार लवकर ओळखून योग्य वेळी उपचार करणे हे आमचे पहिले उद्दिष्ट असते. योग्य उपचारांमुळे काही रुग्णांमध्ये यकृत प्रत्यारोपणाची गरज टाळता किंवा पुढे ढकलता येऊ शकते. मात्र आजार खूप गंभीर झाला आणि यकृताची कार्यक्षमता कायमस्वरूपी कमी झाली, तर योग्य वेळी केलेले यकृत प्रत्यारोपण रुग्णाचे प्राण वाचवू शकते.रुग्णावर सुरुवातीपासून उपचार करणारे यकृततज्ज्ञ आणि यकृत प्रत्यारोपणाची टीम यांच्यात चांगला समन्वय असेल, तर रुग्ण आणि त्याच्या कुटुंबाला योग्य वेळी योग्य निर्णय घेणे अधिक सोपे होते. नाशिकमध्ये उपचार सुरू ठेवत, आवश्यकतेनुसार प्रगत प्रत्यारोपणाची सुविधा नवी मुंबई येथे उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.”

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: रविवार कारंजा परिसरात FDAची धडक कारवाई; ६,६५९ किलो गूळ जप्त; भेसळ व निकृष्ट दर्जाचा संशय

अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई मधील मुख्य लिव्हर प्रत्यारोपण सर्जन डॉ. गुरुप्रसाद शेट्टी म्हणाले “रेफरल म्हणजे केवळ एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये रुग्णाचे स्थलांतर करणे असा याचा अर्थ होत नाही. तर ही एक समन्वित प्रक्रियेची सुरुवात असते. आम्ही रेफर करणाऱ्या डॉक्टरांसोबत मिळून काम करतो आणि रुग्णाचा वैद्यकीय प्रवास समजून घेतो, प्रत्यारोपणासाठीच्या पात्रतेचे मूल्यांकन करतो आणि या गुंतागुंतीच्या उपचारासाठी रुग्ण आणि दाता दोघांनाही मार्गदर्शन केले जाते ” अशा प्रकारे एकत्रितपणे काम केल्याने विशेष प्रत्यारोपण सेवा आणि रुग्णांवर त्यांच्या घराच्या जवळ उपचार करणारे डॉक्टर यांचा जोडण्याचे महत्त्व देखील अधोरेखित होते.

अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.किरण शिंगोटे म्हणाले गंभीर आजारांमध्ये अनेक तज्ज्ञ डॉक्टर आणि हॉस्पिटल्सनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक असते. रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर आणि यकृत प्रत्यारोपण केंद्र एक टीम म्हणून काम केल्यास उपचारात सातत्य राखता येते आणि रुग्णांना आवश्यक त्या प्रगत उपचारांची सुविधा वेळेवर मिळू शकते.अनेक रुग्णांना मिळाला उपचारांचा लाभ गेल्या वर्षभरात मेडिलिव्ह हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या आणि यकृताची कार्यक्षमता गंभीरपणे कमी झालेल्या अनेक रुग्णांवर अपोलो हॉस्पिटल, नवी मुंबई येथे यकृत प्रत्यारोपण करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये मुलींचे शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी 7 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

यातील अनेक रुग्ण प्रगत किंवा अंतिम टप्प्यातील यकृतविकाराने त्रस्त होते. या रुग्णांसमोर उपचारांसोबतच योग्य यकृतदाता शोधणे, प्रत्यारोपणाची प्रक्रिया समजून घेणे आणि उपचारांसाठी आवश्यक आर्थिक नियोजन करणे, अशी अनेक आव्हाने होती. मेडिलिव्ह हॉस्पिटल आणि अपोलो हॉस्पिटलच्या समन्वयामुळे रुग्णांना आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन मिळाले. आवश्यकतेनुसार उपचारांच्या आर्थिक नियोजनासाठी उपलब्ध पर्यायांबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.यशस्वी यकृत प्रत्यारोपणानंतर हे रुग्ण सध्या नियमित जीवन जगत असून, नाशिक येथील मेडिलिव्ह हॉस्पिटलमध्ये नियमित तपासणी आणि पुढील उपचारांसाठी फॉलो-अप घेत आहेत.

ज्या रुग्णासाठी त्यांच्या पत्नीने यकृत दान केले, त्या रुग्णाने सांगितले, “टीमने प्रत्यारोपण आणि दात्याची प्रक्रिया स्पष्टपणे समजावून सांगितली, ज्यामुळे माझ्या कुटुंबाला आत्मविश्वास मिळाला. माझी पत्नी दाता होऊ शकली आणि आज मला जीवन जगण्याची नवी संधी मिळाली आहे.”

अंतिम टप्प्यातील यकृत विकार असलेल्या दुसऱ्या एका रुग्णाने सांगितले, “माझे यकृत निकामी झाले होते आणि मी शेवटच्या टप्प्यात पोहोचलो होतो. डॉक्टरांनी प्रत्यारोपण आणि माझ्या मुलीने दान करण्याबाबतची प्रक्रिया स्पष्टपणे समजावून सांगितली, ज्यामुळे आम्हाला पुढील निर्णय घेण्याचा आत्मविश्वास मिळाला.”

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कागदी टपालाला आळा; ई-ऑफिसचा प्रभावी वापर करा; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे निर्देश

नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल हे अपोलो हॉस्पिटल्स समूहाचा एक भाग असून येथे हेपॅटोलॉजी, हेपॅटो-बिलियरी सर्जरी आणि यकृत प्रत्यारोपणासह प्रगत बहुविद्याशाखीय आरोग्यसेवा दिली जाते. अपोलो समूहाने आपल्या नेटवर्कमध्ये 27,200 हून अधिक महत्त्वाच्या अवयवाचे प्रत्यारोपण (सॉलिड ऑर्गन ट्रान्सप्लांट) आणि 5,000 हून अधिक यकृत प्रत्यारोपण केले आहेत, ज्यामुळे या प्रदेशातील सर्वात अनुभवी प्रत्यारोपण उपक्रमांपैकी एक म्हणून अपोलोची ओळख निर्माण झाली आहे. अपोलो ट्रान्सप्लांट इन्स्टिट्यूटमध्ये दररोज सुमारे पाच सॉलिड ऑर्गन प्रत्यारोपण केले जातात आणि 2012 पासून आशियातील सर्वात व्यस्त सॉलिड ऑर्गन प्रत्यारोपण उपक्रम म्हणून त्यांना मान्यता मिळाली आहे.

अपोलोच्या प्रत्यारोपण उपक्रमाने प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, हेपॅटोलॉजी, ऍनेस्थेशिया, अतिदक्षता आणि सहयोगी विशेषतांमधील तज्ज्ञतेला एकत्र आणले आहे. रुग्णांच्या मूल्यांकनापासून, दाता मूल्यांकन, प्रत्यारोपण आणि प्रत्यारोपण-पश्चात काळजीपर्यंत समर्पित टीम रुग्णांना सहकार्य करते. अपोलोने 1998 मध्ये भारतातील पहिले यशस्वी प्रौढ आणि बाल-यकृत प्रत्यारोपण केले आणि 2025 मध्ये 5,000 यकृत प्रत्यारोपणाचा टप्पा पार केला आहे .

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790