
नाशिक। दि. २१ सप्टेंबर २०२६: नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांची वाहतूक नियोजनबद्ध व सुव्यवस्थित राहावी तसेच गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन करता यावे, यासाठी ओढा आणि देवळाली रेल्वे स्थानकांची आज संयुक्त पाहणी करण्यात आली.
या पाहणी दौऱ्यात नाशिकच्या उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे, रेल्वेच्या भुसावळ विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, किशोर काळे यांच्यासह नाशिक तालुका मास ट्रान्सपोर्ट अथॉरिटी (NTKMA) आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कुंभमेळ्याच्या प्रमुख पर्वणीच्या दिवसांमध्ये मोठ्या संख्येने भाविक रेल्वेने नाशिकमध्ये दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन स्थानकांवरील गर्दीचे नियोजन, भाविकांच्या सुरक्षित हालचाली तसेच वाहतूक व्यवस्थेबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. ओढा व देवळाली रेल्वे स्थानक परिसरात आवश्यकतेनुसार तात्पुरते होल्डिंग एरिया उभारणे, गर्दीचे नियमन करण्यासाठी प्रवेश व निर्गमन मार्गांचे नियोजन करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वाहतूक व मदत व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर निश्चित करण्याबाबत पाहणी करण्यात आली.
तसेच, रेल्वे स्थानकांवरून भाविकांना साधुग्राम आणि रामकुंड परिसराकडे नेण्यासाठी बस शटल सेवांसाठी स्वतंत्र व सुलभ वाहतूक मार्ग उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही प्रत्यक्ष जागांची पाहणी करण्यात आली. स्थानक परिसरात वाहनांची कोंडी होऊ नये, भाविकांची सुरक्षितपणे वाहतूक व्हावी आणि विविध यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय राहावा, यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी रेल्वे, पोलीस प्रशासन, वाहतूक यंत्रणा आणि स्थानिक प्रशासनाच्या समन्वयातून कुंभमेळ्यादरम्यान गर्दी नियंत्रण व वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला. भाविकांची सुरक्षितता, वाहतुकीची सुरळीतता आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या दृष्टीने पुढील नियोजन करण्यात आले.
कुंभमेळ्याच्या कालावधीत लाखो भाविकांच्या सुरक्षित आणि सुलभ प्रवासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि गर्दी नियंत्रण यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने ही संयुक्त पाहणी महत्त्वपूर्ण ठरली.
![]()


