सिंहस्थ २०२७ : घाटांची कामे मार्च २०२७ पूर्वी दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश

नाशिक। २० जुलै २०२६ : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सुरू असलेली घाट, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांची सर्व कामे निर्धारित मुदतीत आणि उच्च दर्जासह पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. ही सर्व कामे मार्च २०२७ पूर्वी पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाची आढावा बैठक रविवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस महापौर हिमगौरी आडके-आहेर, उपमहापौर विलास शिंदे, प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार करणाऱ्याला अटक !

बैठकीत नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरातील घाट विकास, रस्ते आणि संबंधित पायाभूत सुविधांच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रकल्पांची सद्यस्थिती, कामांतील अडचणी, आवश्यक विभागीय समन्वय आणि प्रलंबित बाबींवर चर्चा करत मंत्री महाजन यांनी सर्व कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला.

🔎 हे वाचलं का?:  आजपासून तीन दिवस नाशिक जिल्ह्यासाठी पावसाचा 'यलो अलर्ट'

कामांमध्ये कोणताही विलंब होऊ नये यासाठी जलसंपदा, महसूल, भूमी अभिलेख, पोलीस आणि वन विभागांनी परस्पर समन्वय राखून अडथळे तातडीने दूर करावेत, तसेच आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया गतीने पूर्ण करून प्रकल्पांना वेग द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले.

बैठकीत गोदावरी नदीवरील विविध नवीन घाटांचे बांधकाम, ओढा रामघाट परिसराचा विकास, दसक आणि नांदूर शिवारातील घाट विकास, त्र्यंबकेश्वर येथील नदीकाठावरील घाटांचे बांधकाम, गौतमी गोदावरी धरण ते त्र्यंबकेश्वर उपसा प्रणाली योजना तसेच नंदिनी संगम येथे रबर बंधारा उभारणीसह विविध महत्त्वाच्या प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २२ ते १ ऑगस्ट दरम्यानविशेष आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिर

जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ यांनी सादरीकरणाद्वारे कामांची प्रगती मांडली. याशिवाय प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह आणि महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनीही सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीअंतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती बैठकीत सादर केली.

बैठकीस संबंधित प्रकल्पांचे भूसंपादन अधिकारी, महसूल अधिकारी, कार्यकारी अभियंते आणि प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790