Amazon

नाशिक: सिटीलिंक बसची दुचाकीला धडक; दोन जखमी

नाशिक, दि. २६ ऑक्टोबर २०२६: शहरातील सिटीलिंक बसच्या वेगावर आणि चालकांच्या वाहन चालविण्याच्या पद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. अमृतधाम ते के. के. वाघ कॉलेजदरम्यानच्या सर्व्हिस रोडवर भरधाव सिटीलिंक बसने दुचाकीला धडक दिल्याने दोन मित्र जखमी झाले. गुरुवारी (दि. २२ ऑक्टोबर) रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात घडला. बसचालकाने वेगात वळण घेताना सिग्नल न दिल्याने अपघात झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.

या दुर्घटनेत पराग संजय पाटील आणि श्रीधर कांगणे हे दोघे जखमी झाले. याप्रकरणी पराग पाटील यांच्या तक्रारीवरून बसचालक कृष्णा देवराम गाडर याच्याविरोधात आडगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  निविदेच्या आमिषाने नाशिकच्या उद्योजकाला ४०.६५ लाखांचा ऑनलाइन गंडा

वळण घेताना दुचाकीला धडक:
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, पराग पाटील आणि श्रीधर कांगणे हे एमएच १५ एफएस १४३० क्रमांकाच्या मोपेडवरून अमृतधाम येथून के. के. वाघ कॉलेजच्या दिशेने सर्व्हिस रोडने प्रवास करत होते. त्याचवेळी एमएच १५ जीव्ही ७८८२ क्रमांकाची सिटीलिंक बस भरधाव वेगात आली. चालकाने सिग्नल न देता वळण घेतल्याने बसची दुचाकीला धडक बसली. या धडकेमुळे दोघेही रस्त्यावर पडून जखमी झाले.

सात दिवसांत तीन अपघात; बसचालकांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न:
शहरात अवघ्या सात दिवसांत सिटीलिंक बसशी संबंधित तीन अपघात घडल्याने बसचालकांच्या वेगावर आणि सुरक्षित वाहनचालनेवर नियंत्रण ठेवण्याची मागणी होत आहे. चालकांच्या बेशिस्त वाहनचालनेला आळा घालण्यात सिटीलिंक प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

🔎 हे वाचलं का?:  रामकुंड व त्र्यंबकेश्वर येथील ध्वजारोहण सोहळ्यांसाठी काटेकोर नियोजन करा- शेखर सिंह यांचे निर्देश

मागील आठवड्यात उंटवाडीतील सीटी सेंटर मॉल चौकात सिटीलिंक बसने तीन वाहनांना धडक दिली होती. त्यानंतर सातपूर येथे पाच दिवसांपूर्वी सिटीलिंक बसच्या धडकेत एका कामगाराचा मृत्यू झाला. तर दोन दिवसांपूर्वी इंदिरानगर परिसरात गतिरोधकाकडे दुर्लक्ष करून बस पुढे नेल्याने दरवाजाजवळ तिकीट देणारा वाहक बसबाहेर फेकला गेला. या घटनेत वाहक जखमी झाला होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये आज (दि. २५) ५०१ जणांचा सामूहिक शंखनाद; विश्वविक्रमाचा प्रयत्न

नियंत्रण आणि देखरेखीबाबत नागरिकांची चिंता:
सिटीलिंक बसच्या अपघातांची मालिका पाहता चालकांच्या प्रशिक्षणासह वेगमर्यादा, वाहतूक नियमांचे पालन आणि बसच्या सुरक्षित संचालनावर प्रभावी देखरेख ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे. यापूर्वीही शहरात सिटीलिंक बसच्या अपघातांत अनेक नागरिकांना जीव गमवावा लागल्याचे सांगितले जात आहे. मागील दोन वर्षांत पाच ते सहा नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन, पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाने सिटीलिंक बसच्या संचालनावर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790