अवघ्या ३० दिवसांत ५० लाखांचा परतावा देण्याचे आश्वासन; सायबर पोलिसांत गुन्हा दाखल
नाशिक। दि. २६ ऑक्टोबर २०२६: सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या जाहिरातीवर विश्वास ठेवणे दोघांना महागात पडले आहे. इन्स्टाग्रामवरील रीलमधून अवंतिका इंडस्ट्रीज कंपनीची माहिती मिळाल्यानंतर एका व्यक्तीने आपल्या मेहुण्यासह या कंपनीत १५ लाख रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, अवघ्या ३० दिवसांत ५० लाख रुपये परत मिळण्याचे आमिष दाखवून दोघांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी नाशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विविध माध्यमांतून १५ लाख रुपये वर्ग:
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगत फिर्यादीचा विश्वास संपादन केला. गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या मेहुण्याने वेगवेगळ्या माध्यमांतून पैसे पाठवले.
यामध्ये फिर्यादीच्या युनियन बँकेतील खात्यातून १२ लाख १० हजार रुपये, त्यांच्या मेहुण्याच्या आयसीआयसीआय बँक खात्यातून १ लाख ९९ हजार ५०० रुपये, तर फोन-पेद्वारे ९० हजार ५०० रुपये हस्तांतरित करण्यात आले. अशा प्रकारे एकूण १५ लाख रुपये कंपनीच्या खात्यावर जमा करण्यात आले.
डिमांड ड्राफ्टच्या नावाखाली फसवणूक:
गुंतवणुकीची रक्कम मिळाल्यानंतर फिर्यादीच्या नावाने डिमांड ड्राफ्ट तयार करून दिल्याचे संशयितांनी सांगितले. मात्र, हा ड्राफ्ट सुपूर्द करण्यापूर्वीच कंपनीचा प्रतिनिधी पसार झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
गुंतवणुकीबाबत विश्वास निर्माण करण्यासाठी संशयितांनी फोन आणि ऑनलाइन संवादाचा वापर केला. तसेच कंपनीची नोंदणी, कार्यालय आणि आर्थिक व्यवहार अधिकृत असल्याचा भास निर्माण करण्यासाठी कागदपत्रे दाखविण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलीस करत आहेत.
![]()


