Amazon

निविदेच्या आमिषाने नाशिकच्या उद्योजकाला ४०.६५ लाखांचा ऑनलाइन गंडा

नाशिक। दि. २५ ऑक्टोबर २०२६: सरकारी कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर गुन्हेगारांनी अंबड एमआयडीसीतील एका उद्योजकाची ४० लाख ६५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली आहे. गुजरात राज्य परिवहन मंडळ आणि एका नामांकित कार कंपनीच्या नावाचा गैरवापर करून संशयितांनी बनावट निविदा प्रक्रिया राबविल्याचा बनाव केला. या प्रकरणी नाशिकच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर 24 व 25 ऑक्टोबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन

फिर्यादी उद्योजकाने यापूर्वी गुजरात राज्य परिवहन मंडळाच्या बसच्या आसनांसाठी फोम तयार करण्याचे काम केले होते. याच व्यावसायिक पार्श्वभूमीचा फायदा घेत संशयितांनी त्यांच्याशी ई-मेलद्वारे संपर्क साधला. पुन्हा फोम पुरवठ्याचे कंत्राट मिळवून देण्याचे आश्वासन देत त्यांचा विश्वास संपादन केला. व्यवहार अधिकृत असल्याचे भासवण्यासाठी परिवहन मंडळाचा लोगो असलेली बनावट कागदपत्रे आणि निविदेसंदर्भातील अर्जही पाठविण्यात आले.

मात्र, अनेक दिवस उलटूनही निविदा मंजूर होत नसल्याने उद्योजकाने संशयितांकडे विचारणा केली. त्यावेळी त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यातच संबंधित ई-मेलही सिस्टीमवरून गायब झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच उद्योजकाने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाला जयपूर येथे अपघात; ४ जणांचा मृत्यू

अनामत रकमेच्या नावाखाली लाखोंची वसुली:
निविदा प्रक्रियेसाठी अनामत रक्कम भरणे आवश्यक असल्याचे सांगून संशयितांनी उद्योजकाला विविध बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास भाग पाडले. सुरुवातीला २२ लाख रुपये घेतल्यानंतर एका कार कंपनीच्या वाहनांसाठी फोम पुरवठ्याचे काम मिळवून देण्याचे आणखी एक आमिष दाखविण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: भरधाव सिटीलिंक बसमधून पडून वाहक गंभीर जखमी

अशा प्रकारे तीन वेगवेगळ्या कामांचे कंत्राट मिळवून देण्याचे आश्वासन देत संशयितांनी उद्योजकाकडून एकूण ४० लाख ६५ हजार रुपये उकळले. बनावट कागदपत्रे आणि ई-मेलच्या आधारे करण्यात आलेल्या या फसवणुकीचा तपास आता सायबर पोलिसांकडून केला जात आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790