नाशिक: प्रेमसंबंधातील वादातून तरुणीची भररस्त्यात हत्या; संशयिताची गळफास घेऊन आत्महत्या

नाशिक। १९ जुलै २०२६: इंदिरानगर परिसरात प्रेमसंबंधातील वादातून २० वर्षीय तरुणीची भररस्त्यात धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर फरार झालेल्या संशयित युवकाने काही अंतरावरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मृत तरुणी आणि संशयित युवक यांच्यात गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. संशयिताची ओळख साहिल लाव्हारे (वय २३, रा. यवतमाळ) अशी झाली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: भोंदू अशोक उर्फ ‘कॅप्टन’ खरातविरुद्ध ईडीचे ३ हजार पानी दोषारोपपत्र; ४२.८८ कोटींच्या अपहाराचा ठपका

प्राथमिक तपासानुसार, दोघे काही काळ अमरावती येथे एकत्र राहत होते. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाल्याने संबंधित तरुणी साहिलला न सांगता नाशिकला आली होती. दरम्यान, तिच्या नातेवाईकांनी तिचा विवाह दुसरीकडे ठरवल्याची माहिती मिळाल्यानंतर साहिल नाशिकमध्ये आला आणि तिचा शोध घेऊ लागला.

शुक्रवारी रात्री रथचक्र परिसरातील उद्यानात तरुणी तिच्या मैत्रिणीसोबत बसलेली असताना साहिल तेथे पोहोचला. यावेळी त्याने लग्नाबाबत चर्चा केली. मात्र, तरुणीने नकार दिल्यानंतर संतापलेल्या साहिलने धारदार शस्त्राने तिच्या गळ्यावर वार केले. या हल्ल्यात तरुणीचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 'संकल्प से सिद्धी' उपक्रमातून नाशिकच्या औद्योगिक विकासाला मिळणार नवी दिशा- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

घटनेनंतर साहिल तेथून फरार झाला. काही वेळानंतर इंदिरानगरमधील जॉगिंग ट्रॅक परिसरातील झुडपाजवळील झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. त्याने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. घटनेमागील नेमके कारण आणि इतर सर्व बाबींचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790