नाशिक: विश्व मराठी संमेलनानिमित्त दुमदुमली कुसुमाग्रजांची नगरी; शोभायात्रेत विद्यार्थ्यांसह हजारो नागरिकांचा सहभाग

नाशिक। दि.२८ फेब्रुवारी २०२६: मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, परंपरा, मराठी भाषा -अभिजात मराठीचा जागर करीत आणि ‘ज्ञानोबा माऊली, तुकारामा’च्या गजराने आज सकाळी कविवर्य कुसुमाग्रजांची नगरी अर्थात नाशिक शहर दुमदुमून निघाले होते. त्यात भर पडली होती ती लेझीम, ढोल वादनाची. निमित्त होते, चौथे विश्व मराठी संमेलनाचे. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून आज सकाळी चौथ्या विश्व मराठी संमेलनानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत विद्यार्थ्यांसह हजारो नागरिक सहभागी झाले होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: टेबल टेनिस स्पर्धेसाठी ९ सप्टेंबरला निवड चाचणी

महापौर हिमगौरी आडके- आहेर, उपमहापौर विलास शिंदे, मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ किरण कुलकर्णी, सहसचिव डॉ. नामदेव भोसले, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, मराठी भाषा विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे, जिल्ह्यातील कवी, साहित्यिक यांच्यासह नीलम शिर्के आदी सहभागी झाले होते. त्यांच्या हस्ते ग्रंथ आणि पालखीचे पूजन करण्यात आले. तसेच मराठी भाषा गौरव दिवस अर्थात कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.

चौथे विश्व मराठी संमेलन मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या कविवर्य कुसुमाग्रज नगरीत होत आहे. या नगरीत १ मार्च २०२६ पर्यंत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज सकाळी पालखीसह शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत पारंपरिक लोककला, नृत्य पथक, बोहाडा पथक, लेझीम, ढोल पथकासह वारकरी दिंडी काढण्यात आली. भव्य-दिव्य अशी विठ्ठलाची मूर्ती, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा मुकुट, बोहाडा पथकातील विविध रूपे नागरिकांचे आकर्षण ठरली होती.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तपोवनातील वृक्षतोडप्रकरणी आज (दि. ८) सुनावणी

कुसुमाग्रजांच्या निवासस्थानापासून निघालेली शोभायात्रा त्र्यंबक रोड, सीबीएस, मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ मार्गे कविवर्य कुसुमाग्रज नगरीत पोहोचली. तेथे शोभायात्रेचा समारोप झाला. या शोभायात्रेत मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, परंपरा, मराठी भाषा अभिजात मराठीचा जागर करण्यात आला.

या शोभायात्रेत विविध शाळा, महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शालेय विद्यार्थ्यांनी अभिमान मराठी, अभिजात मराठी संदर्भात विविध संदेश देत विश्व मराठी संमेलनाचाही संदेश दिला. या शोभायात्रेत विन्टेज कार देखील सहभागी झाल्या. त्यात बसण्याचा आनंद अनेकांनी लुटला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790