नाशिक: 1.68 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघे पेडलर पोलिसांच्या जाळ्यात

नाशिक। दि. ९ सप्टेंबर २०२६: शहरात अमली पदार्थांच्या विक्रीविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईला आणखी एक यश मिळाले आहे. पेठरोडवरील अश्वमेधनगर परिसरात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या दोघांना शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. संशयितांकडून तब्बल ५६ ग्रॅम एमडी पावडर, ज्याची अंदाजे किंमत १ लाख ६८ हजार रुपये आहे, जप्त करण्यात आली. गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गौतमी गोदावरी धरणातील बेटावर त्र्यंबकराजांची प्रतिकृती उभारणार; पर्यटन विकासासाठी १७ कोटी ३४ लाख ९० हजार रुपयांच्या कामांना मंजुरी

अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे दर्शन गोरख गायकवाड (२२, रा. मातोरी) आणि रोशन दिनकर लोखंडे (२३) अशी आहेत. म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पेठरोड परिसरातील अश्वमेधनगर रिक्षा थांब्यासमोर काही युवक एमडी ड्रग्जच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांच्यासह पथकाने रात्री परिसरात गस्त सुरू केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये दुचाकी-मोबाइल चोरीचा गुन्हा उघड; विधिसंघर्षित बालक ताब्यात

दरम्यान, एमएच १५ एचटी ३४२३ क्रमांकाच्या दुचाकीवरून दोन तरुण एका मोकळ्या जागेत येऊन थांबले. त्यांच्या संशयास्पद हालचाली पोलिसांच्या लक्षात येताच साध्या वेशातील पथकाने दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आपली ओळख सांगितल्यानंतर पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली.

यावेळी दर्शन गायकवाडकडे बेकायदेशीररीत्या बाळगलेली एमडी पावडर आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. हा अमली पदार्थ त्याने नेमका कोठून मिळवला होता आणि कोणाला विक्री करण्यासाठी आणला होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणी दोघांविरोधात म्हसरूळ पोलिस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: घरफोडी करणाऱ्या तिघांना अटक; ८ गुन्ह्यांची उकल, ६.३१ लाखांचा मुद्देमाल जप्त

दर्शन गायकवाड पोलिस रेकॉर्डवरील आरोपी:
पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित दर्शन गायकवाड हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी आहे. त्याच्याविरुद्ध म्हसरूळ पोलिस ठाण्यात दोन, तर दिंडोरी पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790