नाशिक: मराठी भाषा जागतिक पातळीवर नेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कविवर्य कुसुमाग्रजनगरी, नाशिक। दि. २७ फेब्रुवारी २०२६: कृत्रिम बुद्धिमत्ता एआयमुळे अनेक आव्हानांसोबत निर्माण झालेल्या संधींचा वापर करून जागतिक पातळीवर मराठी साहित्य नेण्याचे कार्य मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून करण्यात येईल. नव्या पिढीत मराठीतील संवाद कौशल्य विकसीत करण्यासाठी भाषेची प्रयोगशाळा (लँग्वेज लॅब) कार्यान्वित करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित चौथ्या विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, संमेलनाचे निमंत्रक तथा मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत, महापौर हिमगौरी आहेर- आडके, खासदार डॉ. शोभा बच्छाव, खासदार राजाभाऊ वाजे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, भाषा विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, विश्व मराठी संमेलनासाठी अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, नॉर्वेसह जगातील विविध देशातून मराठी बांधव नाशिक नगरीमध्ये दाखल झाले आहेत. जगभरातील मराठी माणूस मराठी भाषा आणि महाराष्ट्राचे तेथील सदिच्छा दूत (ब्रॅण्ड ॲम्बेसेडर) आहेत. यांच्या माध्यमातून महाराष्टाची संस्कृती आणि वैभव जगभरात पोहोचते, असू सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी परदेशस्थ मराठी बांधवांना पुढील वर्षी नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याला येण्याचे निमंत्रण दिले.

🔎 हे वाचलं का?:  बनावट शालार्थ आयडी घोटाळा: १६० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक

मराठी भाषेत सर्वाधिक साहित्य तयार होते. देशात सर्वात समृद्ध रंगभूमी मराठी मुलुखात आहे. इथे नवनवीन नाट्याची निर्मिंती होते आणि त्याला प्रतिसाद देणारे रसिकही आहेत. साहित्य, नाट्य आणि लोकगितांची आवड या भूमीला आहे आणि त्याची जपणूक मराठीने केली आहे. मराठी भाषेमुळे तयार झालेल्या लोकपरंपरांमुळे आपले जीवन समृद्ध झाले आहे. कितीही आव्हाने निर्माण झाली, तरी अभिजात साहित्याला आव्हान मिळू शकत नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. भाषेचा अभिमान बाळगण्यासोबत ती ज्ञानभाषा आणि व्यवहार भाषा होणे गरजेचे आहे. त्यासाठी मराठी विभाग चांगले प्रयत्न करीत आहे, असेही ते म्हणाले.

आपल्या इतिहासात स्वभाषेचा अभिमान आणि भाषाशुद्धी सर्वप्रथम शिकवली. परकीय आक्रमकांनी आपल्यावर राज्य केल्याने आपल्या राज्य कारभारात फारसी, अरबी शब्द होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रमाण भाषेचा कोष तयार केला. आधुनिक महाराष्ट्रात भाषा शुद्धीकरणाचे कार्य स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केले. त्यांनी मराठी भाषेला अनेक नवे शब्द दिले. मराठी भाषेच्या सेवेची ही महान परंपरा नाशिक जिल्ह्याने जोपासली आहे, असे श्री.फडणवीस म्हणाले. तसेच कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करू, अशी ग्वाही त्यांनी शेतकऱ्यांना ‍दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: निवासी इमारतीतील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीचा पर्दाफाश; मुख्य संशयित अटकेत, तीन महिलांची सुटका

उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, नाशिक ही आध्यात्माची राजधानी आहे. ही भूमी, संत, विचारवंत, कवी, लेखकांची भूमी आहे. येथे मराठी भाषेचा कुंभमेळा विश्व मराठी संमेलनानिमित्त भरला आहे. मराठी ही मातीशी जोडलेली भाषा आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी लंडनमध्ये महाराष्ट्र भवन उभारणीसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मराठी भाषेचा अभिमान बाळगत तिच्या संवर्धनासाठी प्रयत्न करू या, असेही उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी सांगितले.

मराठी भाषा ज्ञान, विज्ञान, उपजिवीकेची भाषा व्हावी अशी अपेक्षा करून नव्या पिढीला मराठीची गोडी लावण्यासाठी प्रत्येकाने मराठीचा अभिमान बाळगावा, असे आवाहन श्रीमती पवार यांनी केले.

मराठी भाषा मंत्री श्री. सामंत म्हणाले, अजित पवार आणि मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यामुळे मराठी भाषा विभागाचे अंदाजपत्रक 265 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. बोाली भाषा समृद्ध व्हावी यासाठी बोली भाषा महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील मराठी भाषा भवनाचे काम सुरू असून त्याच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पुढील वर्षी २७ फेब्रुवारीला होईल. मराठी भाषेला जागतिक पातळीवर पोहोचविण्यासाठी लंडन येथे राज्य शासनाने मराठी भाषा वैश्विक केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने अनुवाद समिती येत्या तीन महिन्यात गठित करण्यात येईल. या समितीच्या माध्यमातून साहित्य प्रकाशनासाठी मदत केली जाईल. संत वाड्मय मराठी भाषेचा पाया असून संत वाङ्मयाच्या प्रचार व प्रसारासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकसह मध्य महाराष्ट्रात पावसाची उघडीप; घाटमाथ्यावर मात्र मुसळधार पावसाचा इशारा

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते संत निवृत्तीनाथ महाराज विश्वस्त मंडळाला ५० लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला आमदार किशोर दराडे, आमदार ॲड. माणिकराव कोकाटे, आमदार ॲड. राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अखिल भारतीय साहित्य व संस्कृती महामंडळाचे माजी अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे, मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे, उपमहापौर विलास शिंदे आदी उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790