नाशिक। दि. ७ सप्टेंबर २०२६: नाशिक शहराला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्यासाठी सुरू असलेल्या ‘उन्नत नाशिक अभियान’ अंतर्गत ‘मिशन ग्रीन मान्सून’ मोहिमेचा ११ वा टप्पा युवाशक्तीच्या सहभागातून पार पडणार आहे. ‘पर्यावरण संवर्धनाचा खरा आणि मुख्य स्रोत हा देशाचा युवक असला पाहिजे,’ हा विचार केंद्रस्थानी ठेवून द सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या ऐतिहासिक भोसला मिलिटरी कॉलेज कॅम्पस येथे ‘ 5000 देशी वृक्ष वाटप’ सोबतच ‘कुंभ युवा संवाद’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन बुधवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आले आहे.
पालकमंत्री श्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून व प्रमुख उपस्थितीत या उपक्रमांतर्गत भोसला मिलिटरी कॅम्पसमधील तब्बल ५ हजारहून अधिक विद्यार्थी, विविध संस्थांचे प्रतिनिधी, क्रीडा प्रशिक्षक, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडापटू आणि पर्यावरण संवर्धनात सक्रिय असणाऱ्या विविध संस्थांचे पर्यावरण प्रेमी एकत्र येणार आहेत.
या कार्यक्रमात सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेते चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री योगिता माळसे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. पर्यावरण आणि सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेणाऱ्या मान्यवरांसोबतच, पर्यावरण संवर्धनाचा संदेश घराघरांत पोहोचविणाऱ्या युवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स (Reel Stars) यांचाही या व्यासपीठावर सन्मान करण्यात येणार आहे.
संस्थेच्या सर्व शाखांचा या उपक्रमात सक्रीय सहभाग राहणार असून, उपस्थित युवकांच्या माध्यमातून नाशिकमधील घराघरांपर्यंत वृक्षरोपण व वृक्षसंवर्धनाची चळवळ पोहोचविली जाणार आहे.
‘मिशन ग्रीन मान्सून’च्या आतापर्यंत यशस्वीपणे पार पडलेल्या १० टप्प्यांमध्ये नाशिककरांनी उभारलेल्या कामाचा प्रत्यक्ष लेखाजोखा या कार्यक्रमात मांडण्यात येणार आहे. तसेच या मोहिमेमध्ये सातत्याने हातभार लावून मोलाचे योगदान देणाऱ्या विविध सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी संघटना आणि मान्यवरांचा यावेळी प्रमुख अतिथींच्या हस्ते जाहीर गौरव व सत्कार करण्यात येणार आहे.
पुढील टप्प्यात प्रमुख शैक्षणिक संस्थांचा सहभाग
‘मिशन ग्रीन मान्सून’ ही आता एक लोकचळवळ झाली असून, भोसला मिलिटरी कॅम्पसच्या या ११ व्या टप्प्यानंतर पुढील टप्प्यांमध्ये नाशिकमधील इतर नामांकित शिक्षण संस्थां सोबत अशाच व्यापक युवा संवाद व वृक्षलागवड मोहिमा राबविण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री मा.ना. गिरीष महाजन यांच्या कडून देण्यात आली आहे.
![]()


