नाशिक। दि. ७ सप्टेंबर २०२६: शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची ठक्कर बाजार बसस्थानकात मोठी गर्दी झाली असतानाच रविवारी रात्री हृदयद्रावक दुर्घटना घडली. बसमध्ये चढताना झालेल्या रेटारेटीत तोल जाऊन बसच्या चाकाखाली आल्याने १८ वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाला. आकांक्षा रामभाऊ शेलार (१८, रा. शिंदे पळसे) असे मृत युवतीचे नाव आहे.
शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी रविवारी रात्रीपासूनच भाविकांची मोठी गर्दी ठक्कर बाजार बसस्थानकात झाली होती. आकांक्षा ही कुटुंबीयांसह दर्शनासाठी निघाली होती. रात्री सुमारे ११ वाजता त्र्यंबकेश्वरकडे जाणारी बस फलाटावर दाखल होताच त्यात चढण्यासाठी प्रवाशांची मोठी झुंबड उडाली.
याचवेळी बसमध्ये चढण्याच्या प्रयत्नात असलेल्या आकांक्षाला गर्दीतून जोरदार धक्का बसला. त्यामुळे तिचा तोल गेला आणि ती बसच्या मागील चाकाजवळ जाऊन पडली. बसचे चाक तिच्या अंगावरून गेल्याने ती गंभीर जखमी झाली. घटनेनंतर तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या दुर्घटनेनंतर ठक्कर बाजार बसस्थानकात काही काळ मोठी धावपळ उडाली. आपल्या डोळ्यांसमोर मुलगी बसखाली आल्याचे पाहून नातेवाइकांनी केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. आकांक्षाच्या मृत्यूने शेलार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वरकडे लाखो भाविक रवाना होतात, हे माहीत असतानाही ठक्कर बाजार स्थानकात गर्दी नियंत्रणासाठी पुरेशा उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. बसमध्ये चढताना होणारी रेटारेटी टाळण्यासाठी बॅरिकेडिंग, पुरेसा पोलिस बंदोबस्त तसेच अतिरिक्त बसची व्यवस्था वेळेत करण्यात आली असती, तर ही दुर्घटना टाळता आली असती, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
गर्दीचे योग्य नियोजन आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात प्रशासन व एसटी महामंडळ कमी पडल्याचा आरोप या घटनेनंतर पुन्हा ऐरणीवर आला आहे.
![]()


