Amazon

नाशिक: घरफोडी करणाऱ्या तिघांना अटक; ८ गुन्ह्यांची उकल, ६.३१ लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक। दि. ७ सप्टेंबर २०२६: शहरात वाढलेल्या घरफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट-१ ने कारवाई करत तीन सराईत घरफोड्यांना अटक केली आहे. या कारवाईत गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल आठ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून, संशयितांकडून ४५ ग्रॅम सोने, रोकड, कॅमेरा आणि पुरातन नाण्यांसह एकूण ६ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये आज (दि. २५) ५०१ जणांचा सामूहिक शंखनाद; विश्वविक्रमाचा प्रयत्न

अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे लकी विल्सन भंडारे, उमेश कैलास ठोके आणि अजय गोपीचंद बच्छिरे अशी असून, तिघेही शरणपूर रोड परिसरातील रहिवासी आहेत.

गुन्हे शाखा युनिट १ चे प्रशांत मरकड आणि प्रदीप म्हसदे यांना संशयित लकी भंडारे व त्याचे साथीदार चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी व्ही. एन. नाईक महाविद्यालयाजवळील डोंगरे वसतिगृहाच्या मैदानात येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात सापळा रचून तिघांनाही ताब्यात घेतले.

🔎 हे वाचलं का?:  येवला येथे १६० कोटी २५ लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

संशयितांची झडती आणि घराची तपासणी केली असता पोलिसांना सोन्याच्या पाच लगडी, ५८ हजार रुपयांची रोकड, कॅमेरा आणि दोन पुरातन नाणी आढळून आली. या मुद्देमालाची एकूण किंमत ६ लाख ३१ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

चौकशीदरम्यान संशयितांनी घरफोडीतून मिळालेले सोने घरीच वितळवल्याची माहिती दिली. त्यासाठी वापरण्यात येणारे साहित्यही पोलिसांनी जप्त केले आहे. या कारवाईमुळे गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या आठ घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास पुढे सरकला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाला जयपूर येथे अपघात; ४ जणांचा मृत्यू

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने केली. अटक केलेल्या संशयितांची अधिक चौकशी सुरू असून, त्यांच्या माध्यमातून घरफोडीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता तपासी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790