नाशिक। दि. २७ सप्टेंबर २०२६: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नाशिक जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम-२०२६ अंतर्गत रविवार २७ सप्टेंबर २०२६ रोजी सर्व मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांचा लाभ घेऊन पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवावे, तसेच मतदार यादीतील आवश्यक दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम-२०२६ अंतर्गत दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीच्या अनुषंगाने दावे व हरकती सादर करण्याचा कालावधी ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ असा निश्चित करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सोयीसाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिरांमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) उपस्थित राहून नागरिकांना मतदार नोंदणी, मतदार यादीतील दुरुस्ती तसेच नाव वगळण्यासंबंधी अर्ज स्वीकारतील. नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविणे, नावातील किंवा इतर तपशीलातील दुरुस्ती करणे तसेच आवश्यकतेनुसार नाव वगळण्याबाबतची कार्यवाही करता येणार आहे.
१ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र नवमतदारांना प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट करून घेण्यासाठी संधी उपलब्ध आहे. तसेच प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट झाले नसलेल्या पात्र नागरिकांनी नमुना-६ भरून मतदार नोंदणी करता येईल. मतदार यादीतील नाव, पत्ता किंवा इतर तपशिलात दुरुस्ती आवश्यक असल्यास नमुना-८ भरून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करता येईल. मतदार नोंदणीसाठीचे सर्व अर्ज voters.eci.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध आहेत. तसेच संबंधित मतदार नोंदणी कार्यालयातही अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
पात्र नागरिकांनी या विशेष शिबिरांचा लाभ घेऊन आपले नाव मतदार यादीत तपासावे आणि आवश्यक असल्यास विहित नमुन्यात अर्ज सादर करावा. नागरिकांनी संबंधित मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदार यादीतील आपले नाव तपासावे व आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. प्रसाद यांनी केले आहे.
![]()


