दावे-हरकती दाखल करण्यास १२ ऑक्टोबरपर्यंत मुदत;अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार
नाशिक। दि. २६ सप्टेंबर २०२६: भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणासाठी (SIR) सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. १ ऑक्टोबर २०२६ ही अर्हता तारीख निश्चित करण्यात आली असून, दावे व हरकती दाखल करण्यासाठी १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.
भारत निवडणूक आयोगाचे सचिव पवन दिवाण यांनी २६ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्राद्वारे सुधारित वेळापत्रक कळविले आहे. त्यानुसार दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी ३१ ऑगस्ट ते १२ ऑक्टोबर २०२६ असा राहणार आहे.
दावे व हरकतींबाबत नोटीस देणे तसेच त्यांची निकाली काढण्याची कार्यवाही ३१ ऑगस्ट ते १० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत करण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
मतदारांनी या पुनरीक्षण प्रक्रियेत आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही, याची खात्री करून घ्यावी. तसेच आवश्यक असल्यास विहित मुदतीत दावे व हरकती दाखल कराव्यात, असेही आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. प्रसाद यांनी केले आहे.
![]()


