Amazon

नाशिक: रविवार असूनही आज बँका सुरू; २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान तीन दिवसांचा संप

नाशिक। दि. २७ सप्टेंबर २०२६: राष्ट्रीयीकृत आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांचे कामकाज आज, रविवारी (दि. २७) सुरू राहणार आहे. बँक कर्मचारी संघटनांनी २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान तीन दिवसांच्या संपाची हाक दिल्याने सलग अनेक दिवस बँकिंग सेवा विस्कळीत होऊ नयेत, यासाठी आज बँका सुरू ठेवण्यात आल्या आहेत.

यंदा २६ सप्टेंबरला चौथा शनिवार आणि त्यानंतर २७ सप्टेंबरला रविवारची नियमित सुटी होती. त्यानंतर सोमवारपासून तीन दिवसांचा संप असल्याने बँकांना सलग पाच दिवस सुटी किंवा बंदचा सामना करावा लागला असता. त्यामुळे नागरिक, व्यापारी, शेतकरी तसेच अन्य ग्राहकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता होती. ही परिस्थिती टाळण्यासाठी रविवारीही बँकांचे कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील दहा तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांत समावेश

मात्र, सोमवार, दि. २८ सप्टेंबरपासून बुधवार, दि. ३० सप्टेंबरपर्यंत बँक कर्मचाऱ्यांचा नियोजित संप कायम आहे. त्यामुळे या कालावधीत बँकांच्या शाखांमधील प्रत्यक्ष व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

पाच दिवसांचा बँकिंग आठवडा प्रमुख मागणी:
बँक कर्मचारी संघटनांच्या प्रमुख मागण्यांमध्ये पाच दिवसांचा बँकिंग आठवडा लागू करण्याचा मुद्दा आहे. ८ मार्च २०२४ रोजी इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि कर्मचारी संघटनांमध्ये यासंदर्भात सहमती झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्यानंतरही या प्रस्तावावर अंतिम निर्णय झालेला नसल्याने कर्मचारी संघटनांमध्ये नाराजी आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक विभागात २९ सप्टेंबरला १२२ ठिकाणी रोजगार महाकुंभाचे आयोजन

याशिवाय सर्व कर्मचाऱ्यांसाठी न्याय्य परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) व्यवस्था लागू करणे, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे संरक्षण करणे आणि IDBI बँकेच्या प्रस्तावित खासगीकरणाला विरोध करणे, या मागण्याही आंदोलनामागे आहेत. या मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) च्या माध्यमातून संप पुकारण्यात आला आहे.

धनादेश, कर्ज प्रक्रिया आणि रोख व्यवहारांवर परिणामाची शक्यता:
तीन दिवसांच्या संपामुळे बँक शाखांमधील धनादेश वटवणे, कर्जाशी संबंधित प्रक्रिया, रोख रक्कम जमा करणे किंवा काढणे यांसह दैनंदिन बँकिंग सेवांवर परिणाम होऊ शकतो. याचा फटका व्यापारी, नोकरदार, शेतकरी आणि पेन्शनधारकांना बसण्याची शक्यता आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या सविस्तर

सलग सुट्ट्या आणि त्यानंतरचा संप यामुळे काही ठिकाणी एटीएममध्ये रोख रकमेची उपलब्धता कमी होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. मात्र, डिजिटल बँकिंग सेवा आणि एटीएम सेवा पूर्णपणे बंद राहतीलच असे नाही; त्यांची उपलब्धता संबंधित बँकेच्या व्यवस्थेवर अवलंबून राहू शकते.

मागण्या मान्य न झाल्यास २६ ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा:
दरम्यान, २८ ते ३० सप्टेंबरच्या संपानंतरही प्रलंबित मागण्यांवर ठोस निर्णय झाला नाही, तर २६ ऑक्टोबर २०२६ पासून देशव्यापी बेमुदत संप पुकारण्याचा इशारा बँक कर्मचारी संघटनांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात बँकिंग क्षेत्रातील आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790