नाशिक: आषाढी वारीसाठी सर्व विभागांनी समन्वयाने नियोजन करावे- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

नाशिक। दि. १७ जून २०२६: संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा २०२६ च्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळा सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पडण्यासाठी आणि भाविकांना मूलभूत सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री. प्रसाद बोलत होते. जिल्हाधिकारी श्री. प्रसाद म्हणाले की, त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर हा पालखी सोहळा २९ जूनपासून प्रारंभ होत असून दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने वारकरी सहभागी होणार असल्याने विविध सुविधांचे प्रभावी नियोजन करण्याची गरज आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कॉलेज रोडवरील स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; देहव्यापाराचा पर्दाफाश, २ महिला व २ पुरुषांवर गुन्हा दाखल

त्र्यंबकेश्वर–नाशिक मार्गावरील सुरू असलेल्या रस्ते विकास कामांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थापनाच्या दृष्टीने अपघात टाळण्यासाठी आवश्यकतेनुसार उपाययोजना कराव्यात. वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस बंदोबस्त वाढविणे तसेच पालखी मार्गावरील खड्डे बुजविणे, अतिक्रमणे हटविणे आणि झाडांच्या फांद्यांची छाटणी करणे आवश्यक असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.

पालखीच्या मुक्कामस्थळी वारकऱ्यांना मुक्कामासाठी मार्गातील शाळा, सार्वजनिक इमारती व निवारा शेड उपलब्ध करून द्यावेत. यासह पिण्याचे व वापरासाठी पाण्याचे टँकर्स, स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडर, पालखीतील वाहनांसाठी डिझेलची उपलब्धता, चल शौचालय, आरोग्याच्या दृष्टीने डॉक्टर, परिचारक, रूग्णवाहिका, औषधांचा साठा मुबलक ठेवावा तसेच पालखी तळांच्या परिसरातील स्वच्छता, प्रकाश व्यवस्था आणि सुरक्षिततेकडे विशेष लक्ष द्यावे. सर्व सोयी सुविधा भाविकांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महसूल, पोलीस, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, ग्रामविकास, परिवहन व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यात प्रभावी समन्वय ठेवणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्यास 22 जुलैपर्यंत मुदतवाढ

वारी मार्गावर भाविकांच्या व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण दक्षता घेत कोणताही अपघात अथवा अनुचित घटना होणार नाही याची पूर्ण दक्षता घेण्यात यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी दिल्या.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अति. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी डॉ.जयकुमार आढे, पोलीस उप अधिक्षक वासुदेव देसले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, नगरपालिका शाखेचे सहाय्यक आयुक्त शाम गोसावी, सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे, डॉ आवेश पलोड, तहसीलदार गणेश जाधव, तहसीलदार पंकज पवार, तहसीलदार अमोल निकम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे, संत श्री. निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान त्र्यंबकेश्वरचे अध्यक्ष राहुल साळुंखे, सचिव श्रीपाद कुलकर्णी, पालखी सोहळा प्रमुख मनोजकुमार राठी, विश्वस्थ ॲड एस.डी.घोटेकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790