Amazon

महाराष्ट्रात मान्सूनची गती मंदावली; जूनच्या पहिल्या पंधरवड्यात फक्त २६ टक्के पाऊस, पेरणीबाबत सरकारचा इशारा

नाशिक। दि. १७ जून २०२६: महाराष्ट्रात मान्सूनची गती मंदावली असून जूनच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यात अपेक्षेपेक्षा अत्यल्प पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी राज्य मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आलेल्या पीकस्थिती आढाव्यानुसार, १ ते १५ जूनदरम्यान राज्यात सरासरीच्या केवळ २६ टक्के पाऊस झाला. या कालावधीत १०३ मिमी पावसाची अपेक्षा असताना प्रत्यक्षात केवळ २७.४ मिमी पाऊस नोंदविण्यात आला. परिणामी, राज्य सरकारने शेतकऱ्यांना पुरेशा पावसाची खात्री झाल्यानंतरच पेरणी करण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, यंदाचा मान्सून मुंबईकरांचीही प्रतीक्षा वाढवत आहे. गेल्या तीन दशकांतील पहिल्यांदाच जूनच्या पहिल्या पंधरवड्यात मुंबईत समाधानकारक पाऊस झालेला नाही. सांताक्रूझ वेधशाळेत आतापर्यंत फक्त १३.१ मिमी, तर कुलाबा येथे अवघ्या ५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी शहराच्या 'या' विविध मार्गातील वाहतुकीत शुक्रवारी (दि. २५) महत्वाचे बदल...

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २२ जूनपर्यंत नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्या मते, २३ जूननंतर वातावरणीय स्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे असून, त्यानंतर मान्सून तळकोकणातून पुढे सरकण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. हवामान खात्यानेही २५ जून ते १ जुलै या कालावधीत मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता वर्तविली असून जूनअखेरीस व्यापक पावसाची अपेक्षा व्यक्त केली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये मुलींचे शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी 7 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

मान्सूनच्या विलंबामुळे आणि राज्यातील जलसाठ्यांमध्ये होत असलेल्या घटामुळे मंत्रिमंडळाने चिंता व्यक्त केली आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज अधोरेखित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला ऑगस्ट २०२७ पर्यंतच्या पिण्याच्या पाण्याच्या नियोजनासाठी सविस्तर कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबईत मान्सूनसाठी आणखी प्रतीक्षा:
नैऋत्य मान्सूनची पश्चिम शाखा सध्या कमकुवत झाल्याने ८ जूनपासून त्याची प्रगती पश्चिम किनारपट्टीवरच ठप्प झाली आहे. खासगी हवामान संस्था स्कायमेटच्या अंदाजानुसार, मुंबईत मान्सून दाखल होण्यासाठी आणखी ७ ते ८ दिवस लागू शकतात. दुसरीकडे, मान्सूनची पूर्व शाखा स्थिर गतीने पुढे सरकत असून ती ओडिशा, झारखंड आणि बिहारच्या अनेक भागांपर्यंत पोहोचली आहे. पुढील चार ते पाच दिवसांत तेलंगणा, छत्तीसगड तसेच पूर्व भारतातील आणखी काही भागांत मान्सूनची आगेकूच होण्याची शक्यता आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790