नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी जिल्ह्यात 99.84 टक्के मतदान- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

नाशिक। दि.१८ जून २०२६: महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या ‍निवडणुकीसाठी जिल्ह्यातील नऊ मतदान केंद्रांवर आज शांततापूर्ण व सुरळीत वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यात एकूण 619 मतदारांपैकी 618 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. प्राथमिक स्वरूपात एकूण मतदानाची टक्केवारी 99.84 टक्के इतकी नोंदविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यांनतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी श्री. प्रसाद बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मधुमती सरदेसाई, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी डॉ. जयकुमार आढे आदी उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  वाहनधारकांनो लक्ष द्या... PUC तपासणीसाठी आता इतके रुपये मोजावे लागणार

जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले की, या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील नाशिक, दिंडोरी, इगतपुरी, निफाड, येवला, मालेगाव, चांदवड, कळवण आणि बागलाण या नऊ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. मतदान केंद्रनिहाय आकडेवारीनुसार नाशिक केंद्रावर 146 पैकी 146, दिंडोरी येथे 37 पैकी 37, इगतपुरी येथे 47 पैकी 47, निफाड येथे 110 पैकी 110, येवला येथे 88 पैकी 88, चांदवड येथे 41पैकी 41, कळवण येथे 38 पैकी 38, बागलाण येथे 28 पैकी 28 मतदारांनी मतदान केले. मालेगाव केंद्रावर 84 पैकी 83 मतदारांनी मतदान केल्याने तेथे 98.81 टक्के मतदानाची प्राथमिक स्वरूपात नोंद झाली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: वाहन मालकांनी आधार प्रमाणिकरण प्रक्रियेनंतरच हस्तांतरण, ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जिल्हा प्रशासनाने निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक सर्व त्या उपाययोजना केल्या होत्या. मतदान केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था, मूलभूत सुविधा तसेच निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार सर्व व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्व मतदार, निवडणूक अधिकारी, कर्मचारी, पोलीस यंत्रणा आणि संबंधित विभागांचे अभिनंदन करत लोकशाही प्रक्रियेच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल समाधान व्यक्त केले. नाशिक शहरातील मतदान केंद्रांवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली तर ग्रामीण भागात पोलीस अधीक्षक डाॅ स्वामी यांच्या नेतृत्वात पोलीस यंत्रणेने यशस्वीपणे बंदोबस्त पार पाडला. यादरम्यान निवडणूक निरीक्षक मिलिंद शंभरकर यांनी नाशिक तहसील कार्यालयातील मतदान केंद्रासह जिल्ह्यातील अन्य मतदान केंद्रांना भेट देवून पाहणी केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790