
नाशिक। दि. १८ जून २०२६: शहर गुन्हे शाखेच्या पथकाने पहाटेच्या सुमारास कारवाई करत प्रतिबंधित पानमसाला व सुगंधी तंबाखू (गुटखा) वाहतूक करणाऱ्या मालवाहू अॅपेमधून ५ लाख २ हजार ६५९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, गुजरातमधील सुतारपाडा येथून प्रतिबंधित गुटखा नाशिकमध्ये विक्रीसाठी आणला जाणार आहे. त्यानुसार डॉ. मुदगल यांनी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, पोलीस हवालदार प्रविण वाघमारे, संदीप भांड, प्रदीप म्हसदे, नाझीमखान पठाण, प्रशांत मरकड, विशाल काठे, रविंद्र आढाव, पोलीस अंमलदार मुक्तार शेख आणि चालक समाधान पवार यांचे विशेष पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने व्ही. एन. नाईक महाविद्यालय ते पंडित कॉलनी मार्गावरील ठक्कर रिट्रीट परिसरात सापळा रचला. पहाटे सुमारे ३.३० वाजता महिंद्रा कंपनीचा JEETO PLUS (एमएच ४२ ए क्यू ६७२९) हा मालवाहू अॅपे संशयास्पदरीत्या जात असताना पोलिसांनी त्याला अडवून तपासणी केली.
तपासणीदरम्यान वाहनातील चेतन गोविंद मुसळे (वय ४६, रा. त्रिमूर्ती चौक, शिवाजीनगर, सिडको), प्रदीप भाऊसाहेब वल्टे (वय ३५, रा. श्रेया रेसिडेन्सी, शांतीनगर, मखमलाबाद) आणि इरफान अय्युब तांबोळी (वय ४५, रा. वडाळागाव, नाशिक) यांची चौकशी करण्यात आली. वाहनाची झडती घेतली असता २ लाख ५२ हजार ६५९ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला.
चौकशीदरम्यान हा माल गुजरातमधील सुतारपाडा येथील सुनील नावाच्या दुकानदाराकडून आणल्याची माहिती आरोपींनी दिली. तसेच गोट्या सानप, यमराज गायकवाड, इरफान तांबोळी, अमोल मुळे, मंगेश पाटील आणि धनंजय लोखंडे यांच्यासोबत भागीदारीत हा व्यवसाय सुरू असून नाशिकमध्ये विक्रीसाठी गुटखा आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या कारवाईत पोलिसांनी २ लाख ५० हजार रुपये किमतीचे महिंद्रा JEETO PLUS वाहन आणि २ लाख ५२ हजार ६५९ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा असा एकूण ५ लाख २ हजार ६५९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलीस हवालदार प्रशांत मरकड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
![]()


