नाशिक: युवकाकडून गावठी कट्टा जप्त; गुंडा विरोधी पथकाची कारवाई

नाशिक। दि. १८ जून २०२६: नाशिक शहर गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने नांदूर नाका परिसरात कारवाई करत एका युवकाला गावठी कट्टा व जिवंत काडतूसासह ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, एक व्यक्ती बेकायदेशीर शस्त्र बाळगून परिसरात फिरत असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी नांदूर नाका येथील हॉटेल राजगड परिसरात सापळा रचून संशयितावर नजर ठेवली.

🔎 हे वाचलं का?:  वाहनधारकांनो लक्ष द्या... PUC तपासणीसाठी आता इतके रुपये मोजावे लागणार

कारवाईदरम्यान सचिन वानखेडे (वय २८, रा. ड्रीम रेसिडेन्सी, जेलरोड, नाशिक) याला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

ही कारवाई पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण तसेच सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी संदिप पवार, विजय सुर्यवंशी, अविनाश देवरे, प्रदिप ठाकरे, सुनिल आडके, राजेश राठोड, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राकेश राउत, कल्पेश जाधव, सुनिता कवडे यांच्या पथकाने केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' विविध भागांतील वाहतूक मार्गात आज (दि. २६) महत्वाचे बदल

दरम्यान, शहरात गावठी कट्टे आणि काडतुसे आढळून येण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. अशा शस्त्रांच्या बेकायदेशीर वापरातून गंभीर गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने प्रमुख चौक आणि संवेदनशील भागांमध्ये पोलिसांनी नाकाबंदी व तपासणी मोहीम अधिक प्रभावीपणे राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790