
नाशिक। दि. १९ जून २०२६: अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि म्हसरूळ पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोराडे वस्ती परिसरातील एका घरावर छापा टाकून ७ लाख ५५ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याचा साठा जप्त केला. या प्रकरणी संशयित गणेश माधवराव शेटे (रा. गंगावाडी, रविवार पेठ, नाशिक) याच्याविरुद्ध म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात गुटखा, पानमसाला तसेच त्याच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर बंदी लागू असतानाही वरवंडी रोड परिसरातील आळंदी कॅनलजवळील मोराडे वस्ती येथे एका कौलारू घरात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे म्हसरूळ पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांसह संयुक्त छापा टाकला. कारवाईदरम्यान ७ लाख २० हजार रुपये किमतीचा माणिकचंद गुटखा आणि ३५ हजार रुपये किमतीचा प्रीमियम राजश्री पानमसाला असा एकूण ७ लाख ५५ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या फिर्यादीवरून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मनोहर क्षीरसागर करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-१) मोनिका राऊत आणि सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माछरे, गुन्हे शोध पथकाचे हवालदार राकेश शिंदे, कुणाल पचलोरे तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे संकेत येलमामे यांच्या पथकाने केली.
![]()


