Amazon

नाशिक: पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप; २५ हजारांचा दंड

नाशिक। दि. २२ सप्टेंबर २०२६: माडसांगवी शिवारातील माळवाडी येथे चार वर्षांपूर्वी पत्नीची लोखंडी फावड्याने हत्या केल्याप्रकरणी पतीला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांनी आरोपी विशाल राजाराम कापसे (३०) याला दोषी ठरवत जन्मठेपेसह २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. ही शिक्षा सोमवारी (दि. २१) सुनावण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळा: रामकुंड परिसरातील कामे ३ आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश

१६ मे २०२२ रोजी रात्री माडसांगवीतील माळवाडी येथे ही घटना घडली होती. विशाल कापसे हा पत्नी आरतीशी वारंवार वाद घालत आणि मारहाण करत असल्याचे तपासात समोर आले होते. घटनेच्या रात्रीही जुन्या वादातून दोघांमध्ये भांडण झाले. यावेळी विशालने घराजवळील लोखंडी फावडे उचलून आरतीच्या डोक्यावर प्रहार केला. गंभीर दुखापतीमुळे आरतीचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान विशालसह सुरेश कापसे, निवृत्ती कापसे, शोभा ऊर्फ अलका कापसे आणि बंटी कापसे यांनाही आरोपी करण्यात आले होते. मात्र, इतर आरोपींविरुद्ध पुरेसा सबळ पुरावा आढळून न आल्याने न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ‘महाराष्ट्राची लोकधारा’ कार्यक्रमाचे आज (दि. २२) आयोजन; विनामूल्य प्रवेश

खून प्रकरणाचा तपास तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक इरफान शेख आणि पोलिस अंमलदार शिवाजी आव्हाड यांनी केला. तपासात पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्ह्यात वापरलेले लोखंडी फावडे तसेच मृत आरतीचे पाच दात जप्त केले. याशिवाय फॉरेन्सिक आणि इतर तांत्रिक पुरावेही तपासात महत्त्वाचे ठरले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ओढासह देवळाली रेल्वे स्थानकांची पाहणी

सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता शिरीष कडवे यांनी न्यायालयात बाजू मांडली. खटल्यात एकूण नऊ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. परिस्थितीजन्य आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने विशाल कापसे याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790