नाशिकमध्ये ज्वेलर्स दुकान फोडणारे दोन सराईत चोरटे जेरबंद; १३.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक। दि. १५ ऑगस्ट २०२६: इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत माउली ज्वेलर्स येथे झालेल्या घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यात गुन्हे शाखा युनिट-२ ला यश आले आहे. मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील दोन सराईत चोरट्यांना पाथर्डी-गौळाणे परिसरातील दफनभूमीजवळ सापळा रचून पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून सुमारे १३ लाख ३९ हजार २८३ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे काल्या सखाराम बारेला (३१, रा. चिलारिया, ता. वरला, जि. बडवाणी, मध्य प्रदेश) आणि अनिल राजाराम पावरा ऊर्फ वासकले (२३, रा. उप्ला, ता. राजपूर, जि. बडवाणी, मध्य प्रदेश) अशी आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप अकाउंट; सतर्कतेचे आवाहन...

माउली ज्वेलर्स येथे सुमारे दहा दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडी करून दागिने चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट-२ कडून सुरू होता.

दरम्यान, गुन्हे शाखेचे सहायक फौजदार शंकर काळे, पोलिस हवालदार प्रकाश महाजन आणि मनोज परदेशी यांना चोरीचा मोबाइल विक्री करण्यासाठी दोन संशयित काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून (एमपी ४६ झेडए ७३७५) पाथर्डी-गौळाणे येथील दफनभूमीजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे युनिट-२ चे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी परिसरात सापळा रचला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: दारूसाठी पैसे न दिल्याने वृद्ध आईची हत्या; मद्यपी मुलाला अटक

संशयित घटनास्थळी येताच पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीत ४.५० किलो वजनाचे चांदीचे दागिने, सोन्याचे दागिने, तीन मोबाइल फोन आणि दोन मोटारसायकली असा एकूण १३ लाख ३९ हजार २८३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्राथमिक चौकशीत आरोपींनी माउली ज्वेलर्स येथे घरफोडी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गंगापूर रोडवर बेकायदा वृक्षतोड; महापालिकेच्या हाती सीसीटीव्ही फुटेज

ही कारवाई पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, डॉ. समाधान हिरे, संजय सानप, बाळू शेळके, मुख्तारखान पठाण, यशवंत बेंडकोळी, सफौ शंकर काळे, गुलाब सोनार, पोहवा सुनील आहेर, प्रकाश महाजन आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790