नाशिक। दि. २४ ऑक्टोबर २०२६: राजस्थानमधील जयपूर येथे नाशिक जिल्ह्यातील अजमेर सौंदाणे तालुका सटाणा येथील भाविकांच्या वाहनाला पहाटे झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून, अनेक भाविक जखमी झाले आहेत.
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच नाशिकचे पालकमंत्री तथा राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने मदतकार्याच्या अनुषंगाने पुढाकार घेत राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. अपघातातील मृत व्यक्तींचे शवविच्छेदन लवकरात लवकर पूर्ण करून त्यांचे पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्याबाबत संबंधित यंत्रणांना सूचना द्याव्यात, अशी विनंती त्यांनी राज्यपालांकडे केली.
तसेच अपघातात जखमी झालेल्या भाविकांना तातडीने चांगल्या रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर योग्य आणि दर्जेदार उपचार करण्यात यावेत, आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशीही विनंती मंत्री महाजन यांनी केली.
मंत्री गिरीश महाजन यांच्या या संपर्कानंतर राजस्थानच्या राज्यपाल कार्यालयानेही या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असल्याचे स्पष्ट केले. अपघातातील जखमींना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, त्यांच्या उपचारांसाठी संबंधित यंत्रणा कार्यरत असल्याची माहिती राज्यपाल कार्यालयाकडून मंत्री महाजन यांना देण्यात आली.
परराज्यात धार्मिक दर्शनासाठी गेलेल्या नाशिकच्या भाविकांवर ओढवलेल्या या संकटाच्या पार्श्वभूमीवर मृतांच्या पार्थिवांचे अंत्यसंस्कारासाठी लवकरात लवकर त्यांच्या कुटुंबीयांकडे हस्तांतरण व्हावे आणि जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने समन्वय साधला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे नाशिक जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून, मृतांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळावे आणि जखमी भाविक लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी भावना व्यक्त होत आहे.
टीप: भाविकांच्या नावांची पुष्टी होताच नावे याच बातमीत अपडेट केली जातील.
![]()


