Amazon

येवला येथे १६० कोटी २५ लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

नाशिक। दि. २४ ऑक्टोबर २०२६: येवला शहराच्या वाढत्या लोकसंख्येची आणि भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन अमृत २.० अभियानांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या १६० कोटी २५ लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेमुळे शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला नवी बळकटी मिळणार आहे. या योजनेचे नियोजन सन २०५६ पर्यंतच्या लोकसंख्येचा विचार करून करण्यात आले असून, शहराला सक्षम पाणीपुरवठा व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

येवला शहरातील महात्मा फुले नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात मंत्री श्री.भुजबळ यांच्या हस्ते येवला शहर पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. तसेच कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथील साठवण तलावाच्या कामाचे भूमिपूजन आमदार पंकज भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते आज झाले.

मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, येवला शहराचा विस्तार आणि लोकसंख्या वाढल्यामुळे सध्याची पाणीपुरवठा योजना अपुरी असून सध्या नागरिकांना तीन ते पाच दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी आणि भविष्यातील पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणे आवश्यक होते. त्यातूनच नवीन पाणीपुरवठा योजनेची आखणी करण्यात आली आहे. पाणी ही केवळ मूलभूत गरज नसून प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. त्यामुळे पुरेसे आणि शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.

🔎 हे वाचलं का?:  नवमतदार नोंदणीसाठी अवघे चार दिवस शिल्लक; नाशिक जिल्ह्यात ७७ हजारांहून अधिक अर्ज प्राप्त

या योजनेअंतर्गत कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथे ३०० दशलक्ष लिटर क्षमतेचा आरसीसी साठवण तलाव उभारण्यात येणार आहे. गोदावरी डाव्या कालव्यातून या तलावात पाणी आणण्याचे नियोजन असून, येसगाव ते येवला दरम्यान सुमारे १२.८२ किलोमीटर लांबीची पाणी दाबनलिका टाकण्यात येणार आहे. योजनेमध्ये दररोज ७० लाख लिटर पाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असलेला आधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. शहरातील विविध भागांत शुद्ध पाणी पोहोचविण्यासाठी सुमारे ९७.१६ किलोमीटर लांबीचे नवीन वितरण जाळे विकसित करण्यात येईल.

🔎 हे वाचलं का?:  संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा 'या' दिवशी बंद राहणार !

तसेच तहसील रोड, विंचूर रोड आणि बदापूर रोड येथे नवीन उंच जलकुंभ उभारण्यात येणार आहेत. जुन्या व अपुऱ्या क्षमतेच्या जलवाहिन्या बदलणे, विद्यमान वितरण व्यवस्थेत सुधारणा करणे, घरगुती नळजोडण्यांशी संबंधित आवश्यक कामे करणे आणि जलवाहिन्या टाकण्यासाठी खोदलेले रस्ते पूर्ववत करणे, या कामांचाही योजनेत समावेश आहे. ऊर्जा बचतीच्या दृष्टीने सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. ही योजना वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही श्री.भुजबळ यांनी केले.

येवला एमआयडीसीच्या माध्यमातून औद्योगिक विकासाला चालना देण्याचे प्रयत्न सुरू असून, सुखजित बायोकॉर्न लिमिटेडच्या सुमारे ७६० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतील कृषी-आधारित अन्नप्रक्रिया उद्योगामुळे स्थानिक रोजगाराच्या संधी वाढण्यास आणि शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पाणीपुरवठ्याच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच पाण्याचा अपव्यय टाळणे, गळती रोखणे आणि उपलब्ध पाण्याचा जबाबदारीने वापर करणे आवश्यक आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे जतन करणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असून, येवला शहराच्या शाश्वत विकासासाठी शासन व स्थानिक प्रशासन प्रयत्नशील राहील, असे श्री. भुजबळ यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी श्री तुषार आहेर यांनी केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सप्तशृंगी गडावरील गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक निर्बंधांत बदल

यावेळी आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार मारोतराव पवार, उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्षा पुष्पा गायकवाड, नगरपालिकेचे गटनेते दीपक लोणारी, गणेश शिंदे, पाणीपुरवठा सभापती चैताली सचिन शिंदे, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी गणेश अंधुरे, मयूर गोसावी, शेखर शिंदे, उपाध्यक्ष अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, दिलीप खैरे आणि सर्व नगरसेवक यांच्यासह अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790