Amazon

नाशिकमध्ये आज (दि. २५) ५०१ जणांचा सामूहिक शंखनाद; विश्वविक्रमाचा प्रयत्न

नाशिक। दि. २५ ऑक्टोबर २०२६: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचा मंगलक्षण जवळ येत असताना नाशिकमध्ये आज (दि. २५) गोदातीरावर ५०१ शंखांचा निनाद घुमणार आहे. कोजागरी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर देवमामलेदार पटांगणाजवळ होणाऱ्या या सामूहिक शंखनादातून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

सध्या ३०३ जणांनी एकाच वेळी शंखनाद केल्याची नोंद असलेला विक्रम मागे टाकण्याचे उद्दिष्ट असून, ३१ ऑक्टोबरला होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणावेळीही ह्यातले २५१ शंखवादक ध्वजारोहणाच्या नेमक्या क्षणी शंखनाद करणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ‘सिंहस्थ पार्टनर्स’ बैठकीत सीएसआर, तंत्रज्ञान आणि सामाजिक उपक्रमांबाबत चर्चा

नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण व गुणगौरव न्यास संचालित अनंतविजय शंखनाद पथक ह्यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. भारतीय धार्मिक परंपरेत शुभकार्याच्या प्रारंभी शंखनाद करण्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणापूर्वी होणारा हा सामूहिक शंखनाद सांस्कृतिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरणार आहे. प्राचीन परंपरेचा जागर करण्यासोबतच नाशिकच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.

“नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “शंखनाद ही आपल्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेतील महत्त्वाची प्रथा आहे. शुभकार्याचा प्रारंभ शंखनादाने करण्याची आपली परंपरा आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ५०१ जणांनी एकत्र येऊन शंखनाद करणे, हा नाशिकसाठी विशेष क्षण ठरेल. या उपक्रमातून विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न करतानाच आपल्या परंपरेचा जागर व्यापक स्तरावर व्हावा, अशी अपेक्षा आहे. ३१ ऑक्टोबरला ध्वजारोहणाच्या नेमक्या क्षणी हाच समूह शंखनाद करणार असल्याने या परंपरेला सिंहस्थाच्या मंगलारंभाशी जोडण्याची संधी मिळणार आहे.”- कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह

🔎 हे वाचलं का?:  येवला येथे १६० कोटी २५ लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

सायंकाळी सहा वाजण्यापूर्वी विश्वविक्रमाचा प्रयत्न:
आज सायंकाळी चार वाजल्यापासून सहभागी शंखवादकांची नोंदणी, उपस्थिती तपासणी आणि पडताळणी केली जाणार आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या पथकाकडून सहभागींची तपासणी व पडताळणी झाल्यानंतर विश्वविक्रमाचा प्रयत्न करण्यात येईल.

सायंकाळी सात वाजता गोदा आरतीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सामूहिक शंखनाद आणि गोदा आरतीच्या माध्यमातून गोदातीरावर भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  रामकुंड व त्र्यंबकेश्वर येथील ध्वजारोहण सोहळ्यांसाठी काटेकोर नियोजन करा- शेखर सिंह यांचे निर्देश

कार्यक्रमाची वेळ:
दिनांक : रविवार, २५ ऑक्टोबर २०२६
स्थळ : देवमामलेदार पटांगणाजवळ, नाशिक
सहभाग : ५०१ शंखवादक
वेळ : सायंकाळी सुमारे ५.५० वाजेपासून
गोदा आरती : सायंकाळी सात वाजता

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790