नाशिक। दि. १८ जून २०२६: सिडको-अंबड परिसरात शस्त्रांचा धाक दाखवत व्यावसायिकांकडून खंडणी वसूल करून दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगार अंबादास बाळू दांडेकर (वय २३, रा. लेखानगर, सिडको) याच्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत त्याला स्थानबद्ध करून मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
दांडेकरविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे १२ गुन्हे नोंद असून त्याला यापूर्वी तडीपार करण्यात आले होते. मात्र, न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून तो शहरात वावरत विविध गुन्हे करत असल्याचे पोलिस तपासात समोर आले.
शहरातील सराईत गुन्हेगारांवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिल्या होत्या. त्यानुसार अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांनी दांडेकरच्या गुन्हेगारी कारवायांचा तपशील संकलित करून एमपीडीएचा प्रस्ताव सादर केला. साक्षीदारांची पडताळणी आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलिस आयुक्तालयाने १५ जून रोजी त्याच्या स्थानबद्धतेचे आदेश जारी केले.
दरम्यान, अंबड पोलिसांनी आणखी चार सराईत गुन्हेगारांविरोधातही एमपीडीए अंतर्गत कारवाईची प्रक्रिया सुरू केली असून त्यांचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहेत. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
दांडेकरवर मारहाण, दुखापत, खंडणी, वाहनचोरी, घरफोडी, बांधकाम साहित्य चोरी, सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड, जीवे मारण्याच्या धमक्या तसेच तडीपार आदेशाचे उल्लंघन यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. शिवाजी चौक व सिडको भाजी मार्केट परिसरात लोखंडी कोयत्याचा धाक दाखवून वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे.
![]()


