नाशिक: रस्ता की मृत्यूचा सापळा? सातपूर-अंबड लिंकरोडवर चिखलामुळे दुचाकी घसरली, एकाचा मृत्यू

नाशिक। दि. २६ ऑगस्ट २०२६ : सातपूर-अंबड लिंकरोडवरील खड्डे आणि चिखलमय रस्त्याची गंभीर अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. मंगळवारी (दि. २५) दुपारी चुंचाळे फाट्याजवळ निसरड्या रस्त्यावर दुचाकी घसरून झालेल्या भीषण अपघातात ५४ वर्षीय पेंटरचा मृत्यू झाला. सुनील दादाजी बोरसे (वय ५४, रा. अशोकनगर) असे मृताचे नाव आहे.

मंगळवारी दुपारी सुमारे एक वाजता सुनील बोरसे हे ईश्वर जगताप (वय ४०, रा. श्रमिकनगर) यांच्या दुचाकीवरून एक्स्लो पॉइंटच्या दिशेने जात होते. चुंचाळे फाट्याजवळ जगताप यांनी एमएच १४ ईएम ७९७७ क्रमांकाच्या ट्रकच्या बाजूने जात होते. मात्र, रस्त्यावर साचलेल्या चिखलामुळे दुचाकी घसरली. त्यानंतर दोघेही रस्त्यावर कोसळले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: महाडीबीटी 2.0 प्रणालीवर नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी महाआयडी तयार करावा

याचवेळी बोरसे हे ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. दुचाकीचालक ईश्वर जगताप हे या अपघातातून सुदैवाने बचावले.

अपघातांची मालिका; यंत्रणा मात्र सुस्त:
सातपूर-अंबड लिंकरोडवरील खड्डे, चिखल आणि गाळाचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून गंभीर बनला आहे. नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही रस्त्यावरील चिखल हटविणे किंवा खड्डे बुजविण्याबाबत संबंधित यंत्रणांकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप केला जात आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या मार्गावर गेल्या महिनाभरात अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. पपया नर्सरीजवळ, संजीवनगर येथे, प्रणय स्टॅम्पिंग कंपनीजवळ आणि आता चुंचाळे फाट्याजवळ अशा चार ठिकाणी जीवघेणे अपघात झाले आहेत. याशिवाय या कालावधीत २० हून अधिक नागरिक जखमी झाल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिंहस्थासाठी साधुग्राम, मंडप व्यवस्थेचा आढावा; २०१५च्या कुंभमेळ्यातील अनुभवाचा नियोजनात उपयोग

पावसाचे पाणी, चिखल आणि गाळ खड्ड्यांमध्ये साचल्याने हा संपूर्ण मार्ग वाहनचालकांसाठी धोकादायक बनला आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना रस्त्यावरून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी दुचाकी घसरून किरकोळ तसेच गंभीर अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

मंगळवारी झालेल्या दुर्घटनेनंतरही रस्त्यावरील चिखल तातडीने हटविण्यात आला नसल्याने दिवसभर दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना सुरूच असल्याचे स्थानिकांनी सांगितले. रस्त्याची देखभाल करणाऱ्या संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कुटुंबाचा आधार हरपला:
सुनील बोरसे हे पेंटर म्हणून काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या बोरसे कुटुंबाचा प्रमुख आधारच या अपघातात हरपला आहे. बोरसे हे शक्यतो सायकलने प्रवास करण्यास प्राधान्य देत असत. मात्र, मंगळवारी ओळखीचे ईश्वर जगताप यांच्यासोबत दुचाकीने प्रवास करताना काळाने त्यांच्यावर घाला घातला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: २८ ते ३० ऑगस्ट सिंहस्थ 'महाकुंभ भक्ती संगम'चे आयोजन

बोरसे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आई आणि बहीण असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक मृत्यूने सातपूरमधील अशोकनगर आणि श्रमिकनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मनसेचे पदाधिकारी वैभव महिरे यांचे सुनील बोरसे हे सख्खे मावस भाऊ होते.

रस्त्यावरील खड्डे आणि चिखलामुळे वारंवार अपघात होत असताना आता तरी संबंधित यंत्रणांनी जागे होऊन या मार्गाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी संतप्त मागणी नागरिकांकडून होत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790