नाशिक: सिंहस्थासाठी साधुग्राम, मंडप व्यवस्थेचा आढावा; २०१५च्या कुंभमेळ्यातील अनुभवाचा नियोजनात उपयोग

नाशिक। दि. २४ ऑगस्ट २०२६: सिंहस्थ महाकुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर साधुग्राम आणि मंडप व्यवस्थेच्या नियोजनाचा नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने आढावा घेतला. साधुग्राममध्ये उभारण्यात येणाऱ्या तात्पुरत्या सुविधा, विविध पायाभूत सोयी, पाणी-वीज व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षा तसेच संबंधित यंत्रणांच्या जबाबदाऱ्यांचे एकत्रित नियोजन करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल तसेच कुंभमेळा प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, सहायक आयुक्त अमोल चौधरी, तहसीलदार मकरंद दिवाकर व पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी २०१५च्या कुंभमेळ्याच्या नियोजन आणि अंमलबजावणीत प्रत्यक्ष काम केलेले नाशिक महापालिकेचे निवृत्त अधिकारीही सहभागी झाले.

साधुग्राममध्ये आखाड्यांसाठीचे मंडप, विविध पंडाल, सार्वजनिक निवास व्यवस्था, कुंभमेळा कार्यालये, सेक्टर कार्यालये तसेच व्हीआयपी कॅम्प आदींच्या व्यवस्थेचा बैठकीत आढावा घेण्यात आला. या मंडप व्यवस्थेसोबतच वीज, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, निचरा, स्वच्छता, आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था, पोलिस व अग्निशमन सेवा, रुग्णालये आणि प्रथमोपचार केंद्रे यांचाही एकत्रित विचार करण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आरोग्य विभाग सज्ज; २५४ कोटींचा आराखडा

साधुग्राममधील प्रत्येक सुविधा स्वतंत्रपणे उभारण्याऐवजी सर्व पायाभूत सुविधांचा परस्पर समन्वय साधून एकात्मिक नियोजन करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. मंडप व्यवस्था, विद्युत सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, जमीन सपाटीकरण, निचरा, सुरक्षा आणि आरोग्य सुविधांसाठी कुंभमेळा प्राधिकरण, नाशिक महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, आरोग्य यंत्रणा, पोलिस आणि अन्य संबंधित विभागांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्याचे काम सुरू आहे.

मंडप व्यवस्थेसाठी स्वतंत्र यंत्रणा:
विविध विभागांचे कार्यालये व कॅम्प, पोलिस आणि अग्निशमन विभागांच्या गरजा, फर्निचर वितरण, मीडिया सेंटर, रुग्णालये तसेच मंडप व्यवस्थेसाठी आवश्यक इतर बाबींचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. समान स्वरूपाच्या साहित्याची आवश्यकता असलेल्या विविध विभागांसाठी एकसमान निविदा दर पद्धतीचा विचार करण्यात येत असून, मंडप व्यवस्थेसाठी नोडल यंत्रणा निश्चित करण्याबाबतही चर्चा झाली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: रानभाज्यांच्या संवर्धनासोबत बाजारपेठ विकासावर भर देण्याची गरज- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

२०१५च्या अनुभवातून २०२७चे नियोजन अधिक सक्षम:
साधुग्राम आणि मंडप व्यवस्थेचा आढावा घेताना २०१५च्या कुंभमेळ्यात प्रत्यक्ष काम केलेल्या अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग करण्यात आला. निवृत्त शहर अभियंता सुनील खुने, निवृत्त शहर अभियंता यू. बी. पवार, निवृत्त अधीक्षक अभियंता आर. के. पवार, निवृत्त शहर अभियंता एस. आर. वंजारी आणि निवृत्त कार्यकारी अभियंता जी. एम. पगारे यांनी मागील कुंभमेळ्यातील व्यवस्थेचा प्रत्यक्ष अनुभव आणि त्यातून आलेल्या बाबी बैठकीत मांडल्या.

कुंभमेळ्यासारख्या मोठ्या आयोजनातील अनेक बाबी केवळ आराखडे आणि अंदाजपत्रकांवरून निश्चित करता येत नाहीत. साधुग्राममधील प्रत्यक्ष हालचाल, कॅम्पची कार्यक्षमता, पाणी-वीज यांसारख्या सुविधांची गरज, विविध विभागांमधील समन्वय, तात्पुरत्या कामांची क्रमवारी आणि मेळ्याच्या गर्दीच्या काळातील सुविधा व्यवस्थापन याबाबतचा प्रत्यक्ष अनुभव २०२७च्या नियोजनासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ‘आईला २५ हजार देतो’ म्हणत तरुणीला जाळ्यात ओढले; बनावट लग्नातून २ लाख उकळले

२०१५मध्ये कोणत्या व्यवस्था प्रभावी ठरल्या, प्रत्यक्ष अंमलबजावणीदरम्यान कोणत्या अडचणी आल्या आणि यावेळी त्यात कोणते बदल आवश्यक आहेत, याची माहितीही या चर्चेतून मिळाली. त्यामुळे मागील कुंभमेळ्यातील अनुभवांचा उपयोग कामे सुरू झाल्यानंतर नव्हे, तर नियोजनाच्या टप्प्यातच करून संभाव्य अडचणी आधीच दूर करण्यास मदत होणार आहे.

आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की, साधुग्राममधील प्रत्येक व्यवस्था संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून आणि प्रत्यक्ष गरजा लक्षात घेऊन उभारणे आवश्यक आहे. यापूर्वी कुंभमेळ्याचे नियोजन आणि व्यवस्थापन केलेल्या अधिकाऱ्यांचा अनुभव या प्रक्रियेत महत्त्वाचा आहे. २०१५मधील अनुभवातून मिळालेले धडे आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीतील बाबी आताच नियोजनात समाविष्ट केल्याने सिंहस्थ २०२७साठी अधिक सक्षम आणि परिणामकारक साधुग्राम व्यवस्था उभारता येईल.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790