नाशिक: कार झाडावर आदळल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू; दहा जण जखमी

नाशिक । दि. २४ मे २०२६: सप्तश्रृंगी गडावर देवदर्शन करून त्र्यंबकेश्वरकडे निघालेल्या एका कुटुंबाच्या कारला म्हसरूळ परिसरात भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगतच्या वडाच्या झाडावर जोरात आदळली. या दुर्घटनेत ७२ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दहा जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोन महिलांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मोबाईल टॉवर बसविण्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

शनिवारी (दि. २३) सकाळी सुमारे दहा वाजेच्या सुमारास हरिकृपा लॉन्सजवळ हा अपघात घडला. कमळाबाई रामदास सूर्यवंशी (वय ७२) या महिलेचा अपघातात मृत्यू झाला. तर वैशाली उमेश धुमावकर (३३) आणि शोभाबाई धोंडू विश्वे (५४) या गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये चार बालकांचाही समावेश आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चाकूचा धाक दाखवत प्रॉपर्टी ब्रोकरकडून २.२० लाखांची खंडणी; कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील एकाच कुटुंबातील ११ जण कारने (एमएच ४६ एएल ५१२६) सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी गेले होते. देवदर्शन आटोपल्यानंतर ते त्र्यंबकेश्वरकडे निघाले असताना म्हसरूळ परिसरात अपघात झाला.

अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार तुकाराम बाणाईत, आर. डी. जगताप, बीट मार्शल आणि अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 1.68 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघे पेडलर पोलिसांच्या जाळ्यात

या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790