नाशिक: मारहाण करून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पाच जण ताब्यात

नाशिक। दि. २४ मे २०२६: भगूर परिसरात एका युवकाला अडवून मारहाण करत त्याचा मोबाईल लुटून यूपीआयद्वारे खात्यातील रक्कम परस्पर काढणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा युनिट-२ ने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तीन आरोपींसह दोन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास भगूर गावातील खंडेराव मंदिरामागील परिसरात फिर्यादी यांना तीन अज्ञात दुचाकीस्वारांनी रस्त्यात अडवले. कोणतेही कारण नसताना आरोपींनी हाताने तसेच लोखंडी कड्याने मारहाण करून त्यांना जखमी केले. त्यानंतर फिर्यादींचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेत आरोपींनी मोबाईलमधील यूपीआय अॅपचा वापर करून खात्यातून तब्बल ४८ हजार २६८ रुपये परस्पर काढून घेतले. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ २०२७ साठी नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये दिशादर्शक व्यवस्थेची पाहणी; आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा सहभाग

गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे शाखा युनिट-२ चे पथक आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान, संशयित आरोपी अभिषेक पंडीत व त्याचे साथीदार वडनेर गावाजवळील नदी पुलाजवळ बसल्याची माहिती सहायक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे आणि हवालदार सुनील आहेर यांना मिळाली. ही माहिती प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: देशी कट्ट्यासह सराईत गुन्हेगाराला अटक; गुन्हे शाखा युनिट-१ ची मध्यरात्री कारवाई

चौकशीत आरोपींनी अभिषेक कमलेश पंडीत (वय २२, रा. आयोध्यानगर, उपनगर), आशिष राजेंद्र सौदे (वय १९, रा. लक्ष्मीनगर, भगूर) आणि प्रथमेश सुनील बनसोडे (वय २०, रा. लक्ष्मीनगर, भगूर) तसेच दोन विधी संघर्षित बालकांनी संगनमताने गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून पुढील तपासासाठी सर्वांना देवळाली कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790