नाशिक: सिटीलिंक बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या २८४ प्रवाशांवर कारवाई; १४ हजारांचा दंड वसूल

नाशिक। दि. १९ सप्टेंबर २०२६: नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या (सिटीलिंक) बससेवेत विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात ऑगस्ट महिन्यात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या तपासणीत २८४ प्रवासी विनातिकीट आढळून आले असून, त्यांच्याकडून १४ हजार ३२९ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

सिटीलिंककडून नाशिक शहरासह शहर हद्दीपासून २० किलोमीटरपर्यंत बससेवा चालविली जाते. १ ते ३१ ऑगस्टदरम्यान करण्यात आलेल्या तपासणीत विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर ही कारवाई करण्यात आली. प्रवाशांनी प्रवासाचे निर्धारित भाडे भरून वाहकाकडून तिकीट घेणे बंधनकारक असून, विनातिकीट प्रवास हा दंडनीय आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर १९ व २० सप्टेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन; नाव नोंदणीची संधी

वाहकांच्या २६२ प्रकरणांतही कारवाई:
तपासणीदरम्यान वाहकांकडून कर्तव्यात कसूर केल्याची २६२ प्रकरणे समोर आली. यामध्ये प्रवाशांकडून पैसे घेऊनही तिकीट न दिल्याची १२ प्रकरणे, तर पैसे न घेता तिकीटही न दिल्याची २५० प्रकरणे आढळली. या प्रकरणांत संबंधित वाहक एजन्सींवर ३० हजार ४९३ रुपयांचा दंड आकारण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गंगापूर रोडवर जाहिरातींना अडसर ठरतात म्हणून ५५ झाडे तोडली; सहा जणांना अटक

याशिवाय प्रवाशांशी गैरवर्तन करणे, बसथांब्यावर बस न थांबवणे, निर्धारित मार्गात बदल करणे, मद्यप्राशन करून कर्तव्य बजावणे तसेच नियोजित वेळेपूर्वी बस मार्गस्थ करणे अशा प्रकारच्या १७० प्रकरणांत २ लाख ५२ हजार रुपयांचा दंड करण्यात आला.

तक्रारी असल्यास सिटीलिंककडे संपर्काचे आवाहन:
प्रवाशांनी प्रवासाचे योग्य भाडे भरून वाहकाकडून तिकीट घ्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. प्रत्येक प्रवाशाला तिकीट देण्याची जबाबदारी वाहकाची असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पत्नीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी डॉ. नीलेश जेजुरकर पोलिसांच्या ताब्यात

चालक किंवा वाहकांकडून गैरप्रकार अथवा गैरवर्तन झाल्यास प्रवाशांनी सिटीलिंकच्या हेल्पलाइन, मोबाइल अॅप, संकेतस्थळ, ई-मेल किंवा संबंधित कार्यालयात तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790