नाशिक। दि. १९ सप्टेंबर २०२६: सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत सय्यद पिंप्री येथील मे. छाया अॅग्री प्रा. लि. या आस्थापनावर कारवाई करत तब्बल ४८ लाख ८२ हजार ९२० रुपये किमतीचा अन्नसाठा जप्त करण्यात आला.
राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे आणि सहआयुक्त मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त संदीप देवरे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी प्रतीक भड यांच्या पथकाने गुरुवारी (दि. १७ सप्टेंबर) ही कारवाई केली.
कारवाईदरम्यान १२ हजार किलो बेरीस्टा (फ्राईड ओनियन) आढळून आला. त्याची अंदाजे किंमत ४८ लाख ३ हजार २०० रुपये आहे. याशिवाय ३२८ किलो रिफाइंड सनफ्लॉवर ऑइल, ज्याची किंमत ७८ हजार ७२० रुपये आहे, असा एकूण ४८ लाख ८२ हजार ९२० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
तपासणीवेळी अन्नपदार्थांचा साठा ज्या ठिकाणी करण्यात आला होता, तेथील स्वच्छतेची स्थिती समाधानकारक नसल्याचे आढळून आले. तसेच साठवलेल्या अन्नपदार्थांच्या गुणवत्ता आणि सुरक्षिततेबाबतही प्रशासनाला संशय निर्माण झाला. मानवी आरोग्यास धोका निर्माण होऊ शकणाऱ्या परिस्थितीत अन्नपदार्थ साठवून ठेवल्याचे निदर्शनास आल्याने अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील तरतुदींनुसार हा साठा जप्त करण्यात आला.
दरम्यान, विशेष मोहिमेअंतर्गत विविध आस्थापनांमधून अन्नपदार्थांचे नमुने घेऊन त्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली जात आहे. संबंधित व्यावसायिकांकडील परवाने, कागदपत्रे आणि अन्नसाठ्याशी संबंधित नोंदींचीही पडताळणी करण्यात येत आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.
![]()


