नाशिक। दि. ७ ऑक्टोबर २०२६: भारतीय सैन्य, नौदल व वायुदलातील अधिकारी पदाच्या भरतीसाठी आवश्यक सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड परीक्षेच्या मुलाखतीची पूर्वतयारी करून घेण्यासाठी राज्यातील युवक-युवतींसाठी नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात एसएसबी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण 19 ते 28 ऑक्टोबर २०२६ या कालावधीत होणार आहे. प्रशिक्षणार्थींनी 18 ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता प्रशिक्षण केंद्रात हजर राहावे, असे आवाहन छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्राचे प्रभारी अधिकारी ले. कर्नल विलास सोनवणे यांनी केले आहे.
एसएसबी प्रशिक्षण वर्गात प्रवेश मिळण्यासाठी कंबाईड डिफेन्स सर्व्हिसेसएक्झामिनेशन अथवा नॅशनल डिफेन्स ॲकेडमी एक्झामिनेशन अथवा परीक्षा उत्तीर्ण झालेली असावी. त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. याप्रमाणे कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे. संबंधित पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येताना सोबत आणावे. तसेच एनसीसी स्पेशल एन्ट्रीसाठी, टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी व विद्यापीठ प्रवेश प्रणालीसाठी एस.एस.बी. मुलीखतीसाठी कॉल लेटर असावे किंवा शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.
या प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, विभागीय आयुक्त कार्यालय परिसर येथे संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक ई-मेल : training.pctnashik@gmail.com व दूरध्वनी : 0253-2451032 किंवा व्हॉट्सॲप : 9156073306 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दुरध्वनीवर संपर्क साधावा, असेही आवाहन छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्राचे प्रभारी अधिकारी ले. कर्नल श्री. सोनवणे यांनी केले आहे.
![]()


