नाशिक। दि. ६ ऑक्टोबर २०२६: नवरात्रोत्सवाच्या काळात विविध ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष वाहतूक आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. नवरात्रोत्सव शांततेत, सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी वाहतुक सुरळीत ठेवण्यासह सुरक्षा उपाययोजनांना प्राधान्य देवून सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांच्या उपस्थितीत नवरात्री निमित्त पूर्वतयारीचा आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी श्री. प्रसाद म्हणाले की, जिल्ह्यातील वणी, सप्तश्रृंगीगड व चादंवड येथील नवरात्रोत्सवाच्या काळात नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, निर्धारित मार्ग व पार्किंग व्यवस्थेचा वापर करावा आणि आपत्कालीन वाहनांना मार्ग मोकळा ठेवावा. गर्दीच्या ठिकाणी प्रशासन व पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून उत्सव सुरक्षित व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करावा. प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणे, उत्सवस्थळांकडे जाणारे मार्ग तसेच संवेदनशील ठिकाणी आवश्यकतेनुसार वाहतूक नियमन, बॅरिकेडिंग व पर्यायी मार्गांची व्यवस्था करावी. नवीन रस्त्यांवर आवश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक, सूचना फलक, रोड सायनेजेस व रोड फर्निचर बसविण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, वाहतूक नियोजन, अग्निसुरक्षा, वन्यजीव संरक्षण आणि आपत्कालीन परिस्थितीतील संबंधित यंत्रणेने समन्वय ठेवावा, अशा सुचना जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
वाहतूक व्यवस्थेसाठी पोलीस व संबंधित यंत्रणांनी प्रत्यक्ष पाहणी करून गर्दीच्या ठिकाणांची निश्चिती करावी. आपत्कालीन वाहनांना मार्ग मोकळा मिळेल, याची विशेष दक्षता घ्यावी. उत्सव काळात वाहतूक नियमांचे उल्लंघन होणार नाही तसेच नागरिकांना सुरक्षित व सुरळीत वाहतूक व्यवस्था उपलब्ध होईल, यासाठी आवश्यक मनुष्यबळ तैनात करावे. तसेच वन विभाग व पोलीस विभागाने वन्यजीवांशी संबंधित घटना घडल्यास संयुक्तपणे व तातडीने प्रतिसाद देण्यासाठी समन्वय यंत्रणा कार्यरत ठेवावी, वन्यप्राण्यांना, विशेषतः माकड व पक्ष्यांना खाद्य देण्याच्या प्रकारांबाबत व वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आवश्यक ठिकाणी सूचना फलक लावण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी दिल्या.
पोलीस अधिक्षक डॉ. स्वामी म्हणाले की, नवरात्रोत्सवाच्या काळात कुंभमेळयाच्या धर्तीवर नियोजन करुन जिल्ह्यातील सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने व जबाबदारीने काम करावे. कोणत्याही विभागाच्या अधिकाऱ्याला अन्य विभागाशी संबंधित समस्या उद्भवल्यास संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून तातडीने समन्वय साधावा, अशा सुचना पोलीस अधिक्षक डॉ. स्वामी यांनी यावेळी दिल्या.
.
प्रांताधिकारी डॉ. संखे म्हणाल्या की, आगामी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेचे प्रभावी नियोजन करण्यासोबतच संवेदनशील व गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यक्षम ठेवावी. ज्या ठिकाणी सीसीटीव्ही उपलब्ध नाहीत किंवा अतिरिक्त सीसीटीव्हीची आवश्यकता आहे, अशा ठिकाणांची पाहणी करून आवश्यकतेनुसार नवीन कॅमेरे बसविण्याच्या सूचना दिल्या.
तसेच भाविक व नागरिकांच्या वाहतुकीसाठी यंदा दोन शटल बसच्या माध्यमातून सेवा देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. गर्दी वाढल्यास पुढील टप्प्यात शहरातून येणाऱ्या वाहनांसाठी तसेच बाहेरील भागातून येणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे मुख्य मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. वाहतूक, पार्किंग, स्वच्छता, सीसीटीव्ही सुरक्षा आणि आवश्यक पायाभूत सुविधांचे नियोजन समन्वयाने करून नागरिक व भाविकांना सुरक्षित, सुरळीत आणि सुविधाजनक व्यवस्था उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत असल्याचे प्रांताधिकारी डॉ. संखे यांनी सांगितले.
या बैठकीला पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस स्वामी, कळवण प्रांताधिकारी डॉ. कश्मिरा संखे, चांदवड प्रांताधिकारी कैलास कडलग, कळवण तहसीलदार रोहिदास वारुळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशमुख, कळवण सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप विभागीय अधिकारी बिपिन जगताप, वणी वनपरिक्षेत्र अधिकारी दिपावली गायकवाड, चांदवड नगरपरिषदेचे नगर अभियंता भालचंद्र क्षीरसागर, कळवणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. ठोंबरे, सप्तश्रृंगी निवासनी देवीचे ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
![]()


