Amazon

नाशिक: चोरी गेलेला ३.७५ कोटींचा मुद्देमाल पोलिसांकडून फिर्यादींना परत

नाशिक। दि. ३ ऑक्टोबर २०२६: चोरीला गेलेले दागिने, दुचाकी तसेच रोजगारासाठी आवश्यक असलेली वाहने पुन्हा आपल्या ताब्यात मिळाल्याने अनेक फिर्यादींच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले. नाशिक पोलिसांनी विविध गुन्ह्यांच्या तपासादरम्यान हस्तगत केलेला तब्बल ३ कोटी ७५ लाख ३० हजार ७५८ रुपयांचा मुद्देमाल न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून संबंधित फिर्यादींच्या स्वाधीन केला.

गुन्ह्यांचा तपास करताना अधिकाधिक मुद्देमाल हस्तगत करून तो संबंधित मालकांना शक्य तितक्या लवकर परत करण्याच्या सूचना पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस उपायुक्त, परिमंडळ-१ मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही राबविण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: निमाणी, मेळा बसस्थानक परिसरात मोबाइल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश; सहा जण अटकेत

१५ ते ३० सप्टेंबर या कालावधीत आडगाव, पंचवटी, म्हसरूळ, भद्रकाली, सरकारवाडा, गंगापूर आणि मुंबईनाका पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ही प्रक्रिया पार पडली. संबंधित प्रकरणांमध्ये आवश्यक न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जप्त करण्यात आलेला मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आला. यासाठी विविध पोलिस ठाण्यांमध्ये स्वतंत्र कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' भागांत शनिवारी (दि. 3 ऑक्टोबर) वीजपुरवठा बंद राहणार...

चोरीला गेलेले स्त्रीधन आणि दागिने पुन्हा हाती मिळाल्याने अनेक महिला फिर्यादींसाठी हा क्षण भावनिक ठरला. काहींच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. त्याचप्रमाणे चोरीला गेलेली दुचाकी किंवा उदरनिर्वाहासाठी वापरले जाणारे वाहन परत मिळाल्याने वाहनधारकांनाही मोठा दिलासा मिळाला.

कष्टाने कमावलेली मालमत्ता पुन्हा मिळाल्याबद्दल अनेक फिर्यादींनी नाशिक पोलिसांचे आभार मानले. गुन्हा घडल्यानंतर तपास करून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करणे आणि त्यानंतर तो कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मालकाच्या ताब्यात देणे, यामुळे संबंधित नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये ‘ऑक्टोबर हीट’चा चटका वाढला; कमाल तापमान ३४.८ अंशांवर

मुद्देमाल परत करण्याची ही कार्यवाही यापुढेही नियमितपणे सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790