Amazon

नाशिक: एपीके लिंकच्या जाळ्यात अडकवून ६.२८ लाखांचा गंडा; सायबर भामटा गोव्यातून जेरबंद

नाशिक। दि. ३० सप्टेंबर २०२६: व्हॉट्सअॅपवर आलेली संशयास्पद ‘एपीके’ लिंक उघडणे मालेगावातील एका नागरिकाला चांगलेच महागात पडले. लिंकवर क्लिक केल्यानंतर सायबर भामट्याने त्यांच्या व्हॉट्सअॅपचा ताबा मिळवत मोबाइल क्रमांकाशी जोडलेल्या क्रेडिट कार्डमधून तब्बल ६ लाख २८ हजार ६५८ रुपये परस्पर हस्तांतरित केले. नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे या प्रकरणाचा छडा लावत संशयिताला दक्षिण गोव्यातील रिसॉर्टमधून अटक केली. विशेष म्हणजे, फसवणुकीची संपूर्ण रक्कम तक्रारदाराला परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले.

🔎 हे वाचलं का?:  अपोलो हॉस्पिटल्स नाशिकच्या ‘ट्रेकाथॉन २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

मालेगावातील रमजानपुरा परिसरातील नागरिकाला व्हॉट्सअॅपवर ‘एम परिवहन एपीके’ नावाची लिंक पाठविण्यात आली होती. ही लिंक उघडल्यानंतर त्यांच्या व्हॉट्सअॅप खात्याचा सायबर आरोपीने ताबा मिळविल्याचा आरोप आहे. त्यानंतर मोबाइल क्रमांकाशी लिंक असलेल्या क्रेडिट कार्डमधून ६.२८ लाख रुपये परस्पर हस्तांतरित करण्यात आले.

या घटनेनंतर तक्रारदाराने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी डिजिटल व्यवहार, संशयास्पद लिंक आणि आरोपीच्या ऑनलाइन हालचालींचा तांत्रिक पद्धतीने माग काढण्यास सुरुवात केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकरोड, मनमाडसह मुंबई-पुण्याहून दिवाळीनिमित्त ४१८ विशेष रेल्वेगाड्या

तपासादरम्यान पोलिसांना संशयिताचे ठिकाण दक्षिण गोव्यात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत पुष्पेंद्र गणेशकुमार प्रसाद ऊर्फ विहान मल्होत्रा (रा. करकरडुमा, पूर्व दिल्ली) याला दक्षिण गोव्यातील हेरिटेज व्हिलेज रिसॉर्ट येथून ताब्यात घेतले.

सायबर पोलिसांच्या तपासामुळे आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश आले असून, फसवणुकीत गेलेली ६ लाख २८ हजार ६५८ रुपयांची संपूर्ण रक्कम तक्रारदाराला परत मिळवून देण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790